
सुनील बुरांडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विविध घटकांचा सन्मान
वर्धा: समाजात अनेक व्यक्ती श्रीमंत आहेत, पण ज्यांची श्रीमंती दीनदुबळ्यांच्या, गरजूंच्या अडचणीत उपयोगी पडत असेल, तेच खरे समाजसेवक आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व होय. ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे यांनी आयुष्यभर स्वतःच्या कष्टातून मिळविलेली संपत्ती कुटुंबासह समाजाच्याही उपयोगात आणली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कर्तबगार, प्रतिभावान व्यक्तींचा सत्कार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी येथे केले.
ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, शिक्षक संघाचे अध्यक्ष शेखर भोयर, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, विधिज्ञ सागर रोडे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, प्रसिद्ध उद्योगपती कमलेश ठवकर, पिपरीच्या सरपंच वैशाली गौळकार, भाजपचे शहर अध्यक्ष निलेश किटे, बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम टोणपे, प्रमोद राऊत, सामाजिक कार्यकर्ते बाबाराव तुमसरे, प्रसिद्ध विधिज्ञ विजय बेदरकर, माजी सरपंच अजय गौळकार, सोनू खांडेकर, प्रवीण खवशी आदींची उपस्थिती होती.
http://Wealth that preserves humanity is socially beneficial – Kha. Amar Kale
आमदार प्रवीण तायडे म्हणाले, सुनील बुरांडे हे समाजासाठी संचित असून, त्यांचे व्यक्तिमत्त्वात माणसे आपलेसे करण्याचे लोहचुंबक आहे. त्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. माणसे जोडणे आणि त्यांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या नागरी सत्काराला मला सहभागी होता आले, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुनील बुरांडे यांचा खासदार अमर काळे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. संचालन प्रमुख आयोजक सतीश इखार यांनी केले. प्रास्ताविक डॉ विद्या कळसाईत यांनी केले.
आयोजनाकरिता किशोर दोड, किशोर बोंडे डॉ. सुनील चावरे, आशिष काळमेघ, विशाल मेहत्रे, दिलीप भातुकुलकर, विजय घवघवे, अतुल राऊत, भास्कर वाळके, विधिज्ञ वैभव वैद्य, राजेश राजुरकर, सुरेंद्र झाडे, आनंद धामणकर सुधीर वसू, गजानन भातकुलकर, पुंडलिक वसु, प्रवीण चव्हाण, वनिता कोठाळे, विजय खाडे, रक्षा मलिये, अरुण नगराळे, भाविनी निमसडे, अतुल वाटकर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वर्धा शहरातील गणमान्य व्यक्तींसह पिपरी मेघे येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कर्तबगार, प्रतिभावंतांचा सत्कार
या समारंभात दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, माजी सैनिकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यासोबतच ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारक व प्रसारक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणा-या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.