
मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संघाच्या तीन प्रथम सरसंघचालकांच्या कार्यावर आधारित द्विअंकी नाटक ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग येत्या मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 7.30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिराजवळ), मुंबई येथे सादर केला जाणार आहे, अशी माहिती राधिका क्रिएशन्सचे संचालक व नाटकाचे दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
https://www.devendrafadnavis.in/
राधिक क्रिएशन्स, नागपूर-पुणे व ताराराणी क्रिएशन्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे होत असलेल्या या विशेष प्रयोगाचे उद्घाटन मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्रीद्वय मा. ना. श्री. अजित पवार आणि मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महसूल मंत्री, मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, सूचना तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री मा. ना. श्री. आशिष शेलार, तसेच राज्यमंत्री मा. ना. अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहील.
या नाटकाचा 51 वा प्रयोग 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. रवींद्र भुसारी या नाटकाचे मार्गदर्शक असून लेखक श्रीधर गाडगे आहेत. दिग्दर्शन संजय पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे, संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांचे असून सूत्रधार राधिका देशपांडे आहेत. निर्मात्या सारिका पेंडसे आहेत तर अॅड. रमण सेनाड, निलीमा बावणे, अरुणा पुरोहित यांचे निर्मिती सहाय्य लाभले आहे.
सुमारे 2 तास 20 मिनिटांचा कालावधी असलेल्या या दोन अंकी नाटकामध्ये डॉ. हेडगेवार यांचे बाल्यजीवन, वंदेमातरम प्रसंग, काँग्रेस अधिवेशनपूर्व स्थिती, संघ स्थापनेचा संकल्प, संघकार्य विस्तार, महात्मा गांधी व हेडगेवार भेट, श्री गुरुजी गोळवलकर यांचे जीवन, अखंडानंद व गुरुजी संवाद, डॉ. हेडगेवार यांचा अंतिम भाषण प्रसंग, गुरुजींचे सरसंघचालकपद, वल्लभभाई पटेल यांच्याशी संवाद, संघबंदी, काश्मीर विलिनीकरण, आपत्कालीन काळातील सत्याग्रह आणि रामजन्मभूमी आंदोलन यांसारचे प्रसंग दर्शविण्यात आले आहेत.
1889 ते 1996 या 107 वर्षांच्या कालखंडात संघाच्या तीन महान सरसंघचालकांनी उभारलेले आदर्श नेतृत्व आणि राष्ट्रकार्य प्रेक्षकांसमोर उभे करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, असे सारिका पेंडसे म्हणाल्या. ‘संघ गंगा’ या नावाद्वारे संघकार्याच्या अखंड प्रवाहाचे प्रतीकात्मक दर्शन घडवणे आणि त्या प्रवाहाला दिशा देणाऱ्या या तीन व्यक्तींना ‘भगीरथ’ म्हणून गौरवणे हा यामागील उद्देश आहे.
राधिका क्रिएशन्स बद्दल
राधिका क्रिएशन्स, नागपूर यांनी यापूर्वी 2006 मध्ये ‘इदं न मम’ या श्री गुरुजी गोळवलकर यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे 137 प्रयोग यशस्वीपणे केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ हे नवे नाटक सादर केले असून, याचे प्रारंभिक प्रयोग 30 एप्रिल 2025 रोजी नागपूर येथील वनामती सभागृहात पार पडले आहेत. या नाट्यप्रयोगाचे संपूर्ण भारतभर 100 प्रयोग सादर करण्याचा संकल्प राधिका क्रिएशन्सने केला आहे. पत्रकार परिषदला संजय पेंडसे, सारिका पेंडसे, ॲड रमण सेनाड व मीनल मुंडले यांची उपस्थिती होती.

















