
Bid :बीड जिल्ह्याच्या पाटोदा पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्क नोटांचे बंडलच कार्यालयात खोललल्याचे दिसून आले.बीड जिल्ह्याच्या पाटोदा पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्क नोटांचे बंडलच कार्यालयात खोललल्याचे दिसून आले.
पंचायत समिती कार्यालयास 50 लाखांचे दे दान, सुटेल ग्रहण अशी घोषणाबाजी करत आणि बोंबाबोंब करत शेतकऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासावर संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांना विहिरी देण्यासाठी, नागरिकांना घरकुल देण्यासाठी अधिकारी पैशांची मागणी करतात. चाराण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला अशी येथील परिस्थिती आहे, असेही शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले.
पाटोदा पंचायत समितीमध्ये पैसे दिल्याशिवाय कामच होत नसल्याचा आरोप करत येथील काही शेतकऱ्यांनी चक्क कार्यालयातच नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येथील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी पैसेच हवे असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी खोट्या नोटांचे बंडल आणून या खोट्या नोटा सुट्ट्या करत पंचायत समिती कार्यालयात ठेवल्या, तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.बीडच्या पाटोदा पंचायत समितीमधील हा प्रकार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे पाटोदा पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या आंदोलनानंतर अधिकारी मूग गिळून गप्प असल्याचे दिसले.