
नवी दिल्ली, 02 जून: लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना आता दिग्गज क्रिकेटपटूंनी समर्थन जाहीर केलेय. भारतासाठी 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील खेळाडूंनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारींवर केंद्र सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी या दिग्गज क्रिकेटपटूंनी केली आहे.
कुस्तीपटूंसाठी आवाज उठवणाऱ्या या क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावस्कर, मदन लाल, कपिल देव, दिलीप वेंगसरकर आदींचा समावेश आहे. पदकविजेत्या कुस्तीपटूंसोबत पोलिसांनी ज्या पद्धतीने गैरवर्तन केलं आहे, ते अस्वस्थ करणारे आहे. अत्यंत कष्टाने जिंकलेली पदके गंगेत सोडण्याच्या निर्णयाप्रत त्यांना यावे लागणे हे वेदनादायी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. क्रिकेटपटूंनी आंदोलक कुस्तीपटूंनाही संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ‘घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील अशी आम्हाला आशा आहे. कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे दिग्गजांनी त्यांचे निवेदनात म्हटले आहे. ‘पदके गंगेत फेकून देण्याचा निर्णय हृदयद्रावक आहे. कारण पदक मिळवणे सोपे नसते. या पदकांच्या मागे प्रचंड प्रयत्न, त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रम असतात. पदके ही केवळ खेळाडूंचाच नाही तर देशाचाही अभिमान असतात. त्यामुळे खेळाडूंनी भावनेच्या भरात काही करू नये. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
भाजप खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्यावर महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी लैंगिक शोषणाचे व मानसिक छळाचे आरोप केले आहेत. बजरंग पुनिया यानंही असेच आरोप केले आहेत. बृजभूषण याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार कुठलीही कारवाई करत नाही