नागपूर -वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबाराच्या घटनेने कन्हान हादरले. या सुरक्षा रक्षकाला तीन गोळ्या लागल्याने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सुरक्षा रक्षकाची प्रकृती दोन गोळ्या डोक्यात लागल्याने चिंताजनक आहे. मिलिंद समाधान खोबरागडे वय 50 वर्षे असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले. समीर सिद्दिकी (29) आणि राहुल जेकब( 26 ) अशी त्यांची नावे आहेत. नेहमीप्रमाणे मिलिंद शनिवारी कर्तव्यावर हजर होते. समीर आणि राहुल मोटरसायकलने प्रतिबंधित क्षेत्रांत फिरताना आढळले त्यांना हटकण्यावरून हा वाद विकोपाला गेला. आरोपींनी मिलिंद यांच्याशी वाद घातला दोघेही दारूचे नशेत चूर होते. यादरम्यान समीरने खिशातून देशी कट्टा काढला आणि मिलिंदवर गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात या सुरक्षा रक्षकाला सोडूनआरोपी पसार झाले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली.