
अकोला-लोकसभेच्या राज्यातील सर्व ४८ जागा लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. इंडिया आघाडीत प्रवेशासाठी इच्छूक असलेल्या आंबेडकर यांनी अलिकडेच काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता. मात्र, काँग्रेसने त्यांना दाद न दिल्याने आंबेडकर यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीने वर्षभरापूर्वी ठाकरे गटाशी युती केली आहे. पण ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा यासाठी विरोध असल्याचे मानले जात आहे. अलिकडेच वंचित आघाडीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना ई-मेल पाठविण्यात आला. मात्र, काँग्रेसकडून त्यांना कुठलेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी काँग्रेसला आठवडाभरात भूमिका स्पष्ट करण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्याची मुदत संपल्यावर आता वंचित बहुजन आघाडी सर्व जागा लढविणार असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.