
रायपूर (छत्तीसगढ): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. रायपूरमध्ये एका सुरक्षा परिषदेत बोलताना शहा म्हणाले की, “जोपर्यंत नक्षलवादी शस्त्र खाली ठेवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा होणार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.
छत्तीसगढमध्ये नक्षलवाद संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवाद देशासाठी धोकादायक असून तो पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहिम सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
शहा यांनी नक्षलवाद्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी हिंसा सोडून मुख्य प्रवाहात यावे. “जो कोणी शस्त्र सोडून शांततेचा मार्ग स्वीकारेल, त्यांना सरकार मदत करेल,” असे आश्वासनही त्यांनी दिले. या बैठकीत सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. नक्षलवादाविरोधात एक मजबूत रणनीती तयार करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.