
नवी दिल्ली NEW DELHI राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरविण्याचे आदेश विधानसभाध्यक्षांना द्यावेत, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाने तीन हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. (Ajit Pawar Group) कारवाई घाईत करण्याची गरज नाही, असा उल्लेख अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
प्रतोद अनिल पाटील, नरहरी झिरवळ आणि छगन भुजबळ यांच्या नावे या स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या हस्तक्षेप याचिकांतून न्यायालयाला सांगण्यात आलेय की हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. अनिल पाटील यांनी आपण प्रतोद असल्याचे तर नरहरी झिरवळ यांनी आपण उपाध्यक्ष होतो, असे नमूद करीत या प्रकरणात अजिबात घाई करण्याची गरज नसल्याचे याचिकांमध्ये नमूद केले आहे.
तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लवकर निर्णय घेत नाहीत, त्यांना तातडीने निर्णय घ्यायला सांगा, अशी मागणी करीत शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयाने या दोन्ही पक्षांची याचिका एकत्रितपणे ऐकून सुनावणीला घेण्याचे संकेत दिले आहेत.