धम्माचे जीवनशास्त्र : समन्वयसूत्रे

0

– राजेंद्र गोविंदराव नाईकवाडे
नागपूर
९८५०३५१०२५

ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी भगवान बुद्धांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व भारतभूमीवर अवतीर्ण झाले आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात बुद्धविचारांचा म्हणजे बुद्धधम्माचा विलक्षण प्रभाव निर्माण झाला. त्यानंतर कालांतराने बुद्धधर्माचा र्‍हासही झालेला पहायला मिळतो. आधुनिक भारतात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये हे प्राचीन भारतीय असे धम्माचे जीवनशास्त्र पुनरुज्जीवित करून भारताला व जगाला पुन्हा एकदा भगवान बुद्धांच्या आदर्शवादी मानवतावादी जीवनमार्गाकडे नेण्याचा प्रयास केला. तो बुद्धधम्म विचारांचा व्यापक परीघ समजून घेऊन, समकाळात प्रासंगिक ठरणार्‍या धम्माच्या जीवनमूल्यांतील समन्वयसूत्रे शोधण्याचा एक प्रयत्न इथे करावयाचा आहे.

धम्मविचारांचा आशय-परीघ

सर्वसाधारणपणे बौद्ध धम्माची आचारसंहिता समोर ठेवताना ह्या धम्माधारित जीवनमूल्यांच्या केंद्रस्थानी ‘पंचशील’ हे मेरुदण्डासमान आहेत असे लक्षात येते. हे ‘पञ्चसीलानि’ म्हणजे –
१. पाणातिपाता वेरमणी-सिक्खापदं समादियामि।
२. अदिन्नादाना वेरमणी-सिक्खापदं समादियामि।
३. कामेसु मिच्छाचारा वेरमणी- सिक्खापदं समादियामि।
४. मुसावादावेरमणी-सिक्खाापदं समादियामि।
५. सुरा-मेरय-मज्ज- पमादठ्ठाना वेरमणी-सिक्खापदं समादियामि। अशाप्रकारचे मूळ पाली भाषेत वर्णन केले आहेत. वेरमणी म्हणजे दूर राहणे, अलिप्त राहणे. सिक्खापदं म्हणजे ज्ञान, शिक्षण वा प्रतिज्ञा वा व्रत आणि समादियामि चा अर्थ होतो, करने वा ग्रहण करणे. ह्यावरून माणसाचे चरित्र संपन्न करणार्‍या ह्या पाच शीलांचे धम्मातील महत्त्व कळते. तसे भगवान बुद्धांचे संपूर्ण विचार विस्ताराने विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्म पिटक ह्या तीन पिटक-ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आले असल्याने व मूळ पाली भाषेतील ह्या पिटक-साहित्याचे मराठीतही अनुवाद उपलब्ध असल्याने अभ्यासकांना हे सर्व साहित्य आज सहजपणेच उपलब्ध आहे. अर्थात ह्या सर्व साहित्याविषयी, त्यातील तत्त्वज्ञानाविषयी आणि बुद्ध धर्मांतर्गत उपपंथांच्या मतांविषयी जे वाद, मतभेद, मतमतांतरे विद्वानांमध्ये आहेत, त्याच्या खोलात जाण्याची प्रस्तुत अभ्यासकाची प्राज्ञा नसल्याने व लेखविषयक आशयपरीघाची तशी मागणी नसल्याने त्याचा अजिबातच उहापोह इथे केलेला नाही. त्यामुळे धम्माचे जीवनशास्त्र समजून घेण्यासाठी पंचशील व इतर प्रमुख आचारविषयक बाबींवर भर दिलेला आहे.

आंतराष्ट्रीय पातळीवर राजकीय परिप्रेक्ष्यात हेच पाच सिद्धांत ‘पंचशील’ नावाने ओळखले जातात. भारताचे स्वातंत्र्यानंतर विविध देशांसोबत केलेल्या करांरांमध्ये ह्या ‘पंचशीलां’चे प्रतिबिंब पडले आहे. त्यानुसार भारताच्या विदेशनीतीचा तसेच विश्वशांती आणि आंतरराष्ट्रीय सद्भाव व सहयोग ह्यांची एक प्रेरक शक्ती म्हणूनही ह्या सिद्धांतांचे महत्त्व आहे.
१. एक दुसर्‍यांची प्रादेशिक अखंडता व प्रभुसत्ता ह्यांचा सन्मान.
२. एक दुसर्‍यांच्या विरोधात आक्रमण न करणे.
३. आंतरिक विषयात हस्तक्षेप न करणे.
४. समानता व परस्पर लाभ ह्या नीतीचे पालन करणे.
५. शांतिपूर्ण सहअस्तित्वाच्या नीतिवर विश्वास ठेवणे.
अशाप्रकारे वैयक्तिक मनुष्यजीवनाच्या आचरणापासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत ‘पंचशीला’चे असलेले स्थान बुद्धधम्मविचारांची महात्मता अधोरेखित करणारे ठरते.

ह्या आचारधर्मालाच खरेतर मानवी जीवनात मध्यवर्ती स्थान असायला हवे. पण दुर्दैवाने खूपदा बुद्धधम्माची हिरीरीने बाजू मांडणार्‍या व इतर धर्मातील विचारांवर त्या सापेक्षतेने कठोर टीकाटीप्पणी करणार्‍या धम्माच्या समर्थकांमध्येच संबंधित मूल्यांचा अभाव दिसून येतो. त्यातल्या त्यात राजकीय व सामाजिक अभिनिवेशात आघाडीवर असणारी मंडळी बहुधा धम्म जीवनधारणांची प्रत्यक्ष आचरणाच्या पातळीवर अक्षम्य हेळसांड करतानाही पहायला मिळतात. विचारांच्या आणि आचारांच्या क्षेत्रातील हा विरोधाभास खरेतर सर्वच धर्मपंथातील कडव्या अनुयायांमध्येही एक समस्या बनून उजागर होताना दिसतो. जितके म्हणून आचरणाचे नैतिक नियम सहजसोपे वाटतात व उच्चारायला साधेसरळ वाटतात, तितकेच ते कथित आधुनिक, भोगवादी, चंगळवादी, मौजमजावादी, मुक्त-वादी प्रकारच्या मंडळींसाठी ते गैरसोयीचे व अप्रस्तुत ठरतात. अशावेळी मग आचरणाच्या नियमांपासून पलायन करून केवळ विचारकलहाने अन्य गोष्टींच्या वैचारिक मतभेदांचा आसरा घेऊन ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न होताना दिसतो. या ठिकाणी सर्वसामान्य धम्मानुयायी आणि धम्माचे व विशिष्ट विचारांचे राजकीय लाभार्थी ह्यांच्यामध्ये एक अदृश्य रेषा दृष्टीगत होऊ लागते. धम्माच्या जीवनशास्त्रात आणि त्यात प्रतिपादिलेल्या ठसठसीत जीवनमूल्यांच्या आचारणात विसंगतीला व पलायनाला जागाच नसल्याने पायाभूत म्हणून धम्मविचारात त्याचे महत्त्व सदैव अबाधित राहते. जीवहिंसा, चौर्यकर्म, व्यभिचार (कामवासनाविषयक अनाचार), खोटे बोलणे आणि मद्य व अन्य मादक पदार्थ सेवन ह्या पाच दुष्कर्मांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करणे व तिचे काटेकोरपणे पालन करणे जीवनातील विविध वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक समस्यांवरचा मूलभूत उपाय ठरतो. शिवाय जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणून दुःखाचे अस्तित्व, दुःखाचे कारण, दुःखाचे निवारण आणि दुःखनिवारणाचा मार्ग ही चार दुःखसापेक्ष आर्यसत्ये जीवनचिंतनाचा भाग बनणे हे वैचारिक पातळीवर महत्त्वाचे ठरते. आधुनिक चंगळवादी जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर धम्मदर्शनातील हे चिंतन अंगीकारणे अर्थातच वाटते तितके सोपे नाही! याशिवाय सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी (जीवनातील सत्यांविषयी सखोल मनन-चिंतन करणे) ह्या अष्टांग मार्गात जीवनाचे सारे आदर्श सामावलेले दिसतात. तद्वतच ‘महामंगल सुत्तांत’ जीवनातील मंगलमय पुण्यकार्ये कोणती आहेत ह्याविषयी केलेला उपदेश ही अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे उत्तम-मंगल ठरतो.
“असेन्नाच बालानं पण्डितानं च सेवना। पूजा च पूजतीयानं एतं मङ्गलमुत्तमं॥” (मुर्खाच्या संगतीपासून दूर राहणे, पंडितांची संगति धरणे आणि पूज्य जनांची पूजा करणे, हे उत्तम मंगल होय.)
इथे हे महामङ्गल सुत्त मनात घोळत असताना आपल्या मनात काही चिरपरिचित अशा मोरोपंतांच्या आर्या सहजच रूंजी घालतात. “सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, / कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो,… स्वतत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो/ पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो.” (श्लोककेकावली, मोरोपंत)

धम्मातील आदर्श जीवनमूल्यांची ही सार्वत्रिकता किंवा एकूणच भारतीय धारणा-विचारांतील अथवा विविध पंथोपपंथातील मूल्यांची ही बुद्धधम्माशी अनुबंध राखणारी विचारगाथा लक्षणीय म्हटली पाहिजे. अन्यत्र एके ठिकाणी विनोबांनी जो संतवचनांशी आणि उपनिषद- चिंतनाशी धम्मसूत्रांच्या साम्यतेचा व समन्वयाचा मुद्दा मांडलेला आपण उद्धृत केला आहे, तो चिंतनीय आहे. प्र. ग. सहस्त्रबुद्धे ह्यांनी मराठीत जीवनमूल्ये भाग 1, 2 व 3 ह्या तीन छोट्या पुस्तिकांमधून (भारतीय विचार साधना, नागपूर 1971, 1991) सार्वत्रिक अशा भारतीय जीवनमूल्यांची जी मांडणी केली आहे किंवा गांधीजींच्या प्रार्थनासभेतील व दैनंदिन आचारसंहितेतील जी ‘एकादश व्रते, आहेत त्यांचाही अनुबंध धम्मविचारांशी थेट जुळणारा आहे. सहस्रबुद्धे ह्यांनी अलोलुपता, तेजस्विता, शुचिता, मृदुता, अद्रोह, क्षमा, त्याग, अक्रोध, धृती, सत्यमेव जयते, श्रद्धा, सात्त्विकता, दान, दम, ऋजुता, अहिंसा, परनिंदा भयावहा, शांती, दया इत्यादी विविध जीवनमूल्यांची जी चर्चा केली आहे, त्यातही धम्मचिंतनसूत्रांचा अंगिकार स्पष्ट दिसतो. ‘भारतीय विचारधन’ ह्या प्रा. श्री. मा. कुलकर्णी ह्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथात (विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, 1993) ‘भारतीय जीवनमूल्ये’ या पहिल्या प्रकरणात सत्यवादित्व, त्याग, संन्यास, माता-पिता-गुरुगौरव, ज्ञानोपासना, शील अथवा चारित्र्य (पृ. 9 ते 41) ह्या जीवनमूल्यांचे विस्ताराने विश्लेषण आले आहे. खरेतर ही तुलनात्मक चिकित्सा विविध अंगांनी व विस्ताराने करण्यासारखी असली तरी इथे प्रातिनिधिक स्वरूपात एवढी पुरेशी ठरते. रमेश पतंगे ह्यांनी लिहिलेल्या ‘तथागत और श्रीगुरुजी’ (श्रीभारती प्रकाशन, नागपूर, 2008) ह्या छोट्या पुस्तिकेतही बुद्धविचारांच्या श्रीगुरुजींच्या विचारधनातील स्वीकाराचे अनुबंध साक्षेपाने मांडून दाखविले आहेत. मंगलसुत्तात पुढे भगवान बुद्ध म्हणतात- “पतिरुप देसवासो च, पुब्बे च कत पुञ्ञता। अत्तसम्मापणिधिच एतं मंगलमुत्तमं॥ बाहु सच्चञ्च सिप्पञ्च, विनयो चं सुसिक्खितो। सुभासिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमं॥” (योग्य देशात वस्ती करणे, पदरी पुण्याचा साठा करणे आणि सन्मार्गात मन दृढ करणे हे उत्तम मंगल होय. पुष्कळ विद्या शिकणे, कला शिकणे, सद्वर्तनाची सवय लावणे आणि समयोचित भाषण करणे, हे उत्तम मंगल होय.) “दानं च धम्मचरिया च ञातकानं च सङ्गहो। अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमं॥ आरति विरति पापा, मञ्जपाना च संयमो। अप्पमादो च धम्मेसु, एतं मङ्मलमुत्तमं॥ गारवो च निवातो च, सन्तुट्ठि च कतञ्ञुता। कालेन धम्मसवणं, एतं मंगलमुत्तमं॥ नपो च ब्रह्मचरियं अरियसच्चानं दस्सनं। निब्बानसच्छिकिरिया च, एतं मंगलमुत्तमं॥” (दानधर्म, धार्मिक आचरण, नातलगांचा संग्रह, प्रशस्त कर्मे, पापापासून पूर्ण निवृत्ति, मद्यपानापासून संयम, धर्म कृत्यात दक्षता, आदर, नम्रता, संतुष्टि, कृतज्ञता आणि योगय काळी धर्मश्रवण, क्षमा, गोड बोलणे, श्रमणांची भेट आणि योग्य काळी धर्मचर्चा, तपश्चर्या, ब्रह्मचर्या, आर्य सत्ये जाणणे आणि निर्वाणाचा साक्षात्कार करुन घेणे हे उत्तम मंगल होय.) (पृ. 21 ते 24, बुद्ध वंदना, सूर्यकांत भगत, सुधीर प्रकाशन, वर्धा, 2006) इथे पाली भाषेतून मांडलेल्या काव्यात्म विचारात एकीकडे जसे आशयाचे उदात्त सौंदर्य जाणवते, त्याचप्रमाणे अभिव्यक्तीचे, शब्दांचे आणि रचनेचेही सौंदर्य जाणवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच बुद्धधम्माच्या सर्वच उपदेशाचे काव्यात्म स्वरूप चिरकाळ टिकलेले व पिढ्यांपिढ्यांपासून आधुनिक युगापर्यंत साहित्यरूपात विद्यमान-अम्लान राहिलेले दिसते. तत्कालीन सर्वसामान्य समाजाच्या प्राकृत-पाली भाषेचा आश्रय घेऊन बुद्धाने आपले क्रांतिकारक असे जीवनदर्शन सर्वदूर भारतात पोचवले व तेच पुढे त्यांच्या शिष्यांद्वारा जगभर पोचलेले दिसते. त्यामागे आशयरूपासोबतच अभिव्यक्तीच्या काव्यात्म सूत्ररूपाचीही शक्ती उभी आहे.

धम्माविषयी आणि ‘धम्मपदा’ विषयी विनोबा

धम्मपदामध्ये बुद्धधम्माच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचे, शिकवणुकीचे आणि जीवनशास्त्राचे सारं आले आहे, असे दिसते. त्यामुळेच विनोबांसारखे आध्यात्मिक मार्गदर्शक ‘धम्मपदा’तील उपदेशाला फार महत्त्व व मध्यवर्ती स्थान देताना दिसतात. ते समजून घेणे इष्ट ठरते. विनोबांनी धम्मपदातील उपदेशाला विविध भागांमध्ये विभक्त केले असून त्याचे प्रमुख तीन भाग – 1. कर्मयोग 2. साधना आणि 3. निष्ठा असे ते करतात. तर त्या अंतर्गत विषयांची मांडणी करताना – 1.निर्वैरता 2. शील 3. संत्संगति 4. कर्मविपाक 5. नीति, 6. अ-निंदा 7. आत्म-दमन, 8. देहानित्यत्व 9. जागरुकता 10. शोधन, 11. प्रज्ञायोग 12. वितृष्णता 13. बुद्ध-बौद्ध, 14. सद्धर्म 15. पंडित 16. भिक्षू 17.अर्हत् 18. ब्राह्मण. अशा १८ विभागांमध्ये ते बुद्ध-उपदेशाची विभागणी करतात. पहिले १२ भाग म्हणजे एकप्रकारे बुद्धधम्माची बुद्धाने कथन केलेली जीवनमूल्येच आहेत. ज्याच्या प्रत्यक्ष आचरणाला बुद्धधम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्याच जीवनमूल्यांतील आणि बुद्धाच्या ‘पंचशीलांतील बहुतेक गोष्टी महात्मा गांधींच्या दैनंदिन आश्रम प्रार्थनेचा अविभाज्य भाग आहेत. जी एकादशव्रते गांधीनी व विनोबांनी आपल्या प्रत्यक्ष जीवनात आचरली आणि आयुष्यभर त्याचा उपदेश अनुयायांना केला, त्या एकादशव्रतांचे नाते ह्या बुद्ध तत्त्वज्ञानातील आणि त्याही पूर्वीच्या वेदोपनिषदांतील जीवनमूल्यांशी जुळताना दिसते. उदाहरणार्थ प्राचीन सनातन धर्मपद्धतीत कथन केेलेली ‘दशमं धर्मलक्षणम्’ ह्यांचाही अनुबंध पंचशीलाशी किंवा भगवान महावीरांच्या पाच महनव्रतांशी तसेच गांधीजींच्या प्रार्थनासभेशी आणि तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेशी सहजपणे जुळताना दिसतो.

‘धम्मपदा’च्या अखेरच्या भागात ‘बुद्ध’, ‘पंडित’, ‘भिक्षू’, ‘अर्हत्’ आणि ‘ब्राह्मण ह्या पाच संकल्पनांचा गाभा आणि अपेक्षित आशय स्पष्ट झालेला आहे. आधुनिक काळात अशा प्रकारच्या संज्ञांचा वा शब्दांचा वापर करून मुख्यत्वे सामाजात जातीयता, जातिभेद व जात्यंधता पसरवण्याचे कार्य काही मंडळी एखाद्या मिशनप्रमाणे करीत असतात! ह्या मंडळींच्या विचारप्रतिपादनावर बुद्धाच्या धम्मपदात स्पष्ट केलेल्या ‘पंडित’, ‘भिक्षू’, ‘अर्हत’, ‘ब्राह्मण’, ‘बुद्ध’, या संकल्पनांच्या आशयपरिघामुळे मूळावरच घाव घातला जातो. कारण ही सर्व स्वतः बुद्धांचे प्रतिपादन केलेली तत्त्वे आणि अर्थ असल्याने त्याचे मर्म आपण आजही आधुनिक काळात समजून घेऊ शकतो. धम्मपदातील ह्या एकूण 100 विचारगुच्छांमधून वा सुभाषितांमधून वा सुविचारांमधून एकूणच बुद्धाचे संपूर्ण ‘जीवनदर्शन’ आपल्याला घडते. त्याचप्रमाणे 14 च्या ‘सद्धर्म’ या भागात-बुद्धाच्या शिकवणुकीचे सार प्रकट होते. “पापमात्र न करणे, पुण्य संपादन करणे, स्वचित्त शुद्ध करते ही बुद्धाची शिकवण होय.” (सब्बपापस्य अकरणं कुसलस्स उपसंपदा/सचित्त परियोदपनं एवं बुद्धान् सासनं)

बुद्धदर्शनाविषयी विवेकानंद

भगवान बुद्धांच्या ह्याच सार्वकालिक नीतिमान आणि ‘भवतु सब्ब मंगलम्’च्या मानवतावादी सर्वमंगल विचारांचा प्रभाव आद्य शंकराचार्यांपासून ते स्वामी विवेकानंदापर्यंतच्या हिंदुधर्माच्या पुनरुज्जीवक भाष्यकारांवरही पडलेला दिसतो. ह्या महान पुरुषांच्या मते बुद्ध धम्माचा मार्ग हा एक प्रकारे औपनिषदिक प्राचीन हिंदुधर्माच्या शुद्धीकरणाचा आणि त्यातूनच विकासित झालेला अधिक शुद्ध स्वरूपातील वेदान्ताचा व अद्वैतदर्शनाचा वेगळा आविष्कार आहे. त्यामुळेच स्वामी विवेकानंद या संदर्भात म्हणतात- “बुद्ध देवांनी वेदान्त प्रकाशात आणला, त्याचा लोकांत प्रचार केला आणि अशा रीतीने भारताला वाचविले…. खरे म्हणजे वेदान्ताचे बौद्ध धर्माशी काहीच भांडण नाही. सर्वांचा समन्वय करणे हे वेदान्ताचे उद्दिष्ट आहे.” (पृ. 85, विवेकवाणी) “बुद्धदेव ध्वंस करण्यासाठी आले नव्हते, ते पूर्ती करण्यासाठी आले होते आणि म्हणून त्यांचा धर्म म्हणजे हिंदू धर्माचीच स्वाभाविक परिणती, हिंदूधर्माचाच स्वाभाविक विकास होय.” …जगात गौतम बुद्धसारखा नीतिवान, चारित्र्यशील व्यक्ती बघावयास मिळाव्यात अशी माझी मनीषा आहे. सगुण ईश्वरावर व देहाभिमानी आत्म्यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्या बाबतीत ते पूर्ण अज्ञेयवादी होते, परंतु इतरांसाठी प्राण द्यावयास ते सदैव तयार होते, त्यांचे अवघे जीवन दुसर्‍यांचे हित करण्यात गेले.” (पृ. 13 विवेकवाणी)

बुद्धदेव हे थोर वेदान्ती होते. (कारण खरे पाहता बौद्धधर्म ही हिंदुधर्माचीच एक विशिष्ट शाखा होती. आणि शंकराचार्यांचा कुणी कुणी पुष्कळदा ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हणतात. बुद्धांनी विश्लेषण पृथक्करण केले, शंकराचार्यांनी त्या साव्याचे संश्लेषण व संयोगीकरण केले.” (पृ. 78, विवेकवाणी) “जगाला सर्वांग संपूर्ण नीतिशास्त्राची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होत. उच्च जीवनासाठीच ते उच्च जीवन जगले. चांगुलपणासाठीच ते चांगले होते, प्रेमासाठीच त्यांनी प्रेम केले.” (पृ. 82) “जो धर्म उपनिषदांमध्ये विशिष्ट जातीपुरताच मर्यादित होती तो सर्वांना लाभावा म्हणून बुद्धदेवांनाी तो मोकळा केला आणि त्या वेळच्या प्रचलित भाषेत सोप्या गोष्टी सांगून त्याचा खूप प्रचार केला, त्यांचा मोठेपणा त्यांनी प्रतिपादिलेल्या निर्वाणाच्या सिद्धांतात नाही, तर त्यांचा ठिकाणी अखिल विश्वाविषयी जी अतुलनीय सहानुभूती होती तिच्यातच त्यांचा थारेपणा साठवलेला आहे. ज्या उच्च प्रकारच्या समाधींनी त्यांच्या धर्माला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या बहुतेक सार्‍याच समाधी वेदांमध्ये आहे, वेदांमध्ये जर काही नसेल तर ते म्हणजे भगवान बुद्धांचे हृदय आणि त्यांची बुद्धी आणि या हृदयाला आणि बुद्धीला जगाच्या इतिहासात तोड नाही.” (पृ. 82) (पृ. 82, विवेकवाणी, रामकृष्ण मठ, नागपूर, 2002) अशाप्रकारे बुद्धधम्माचा उदार मनाने स्वीकार करताना व त्याची मुक्तपणे महती कथन करताना स्वामी विवेकानंद दिसतात. हे समन्वयसूत्र मौलिक व महत्त्वाचे मानायला हवे.

धम्माची जीवनसूत्रे आणि बाबासाहेबांची मांडणी

एका मोठ्या कालखंडावर जगभर आपला प्रभाव गाजविल्यानंतर भारतातून बौद्धधम्माचे लुप्तप्राय होणे हा विचारकांसाठी नेहमीच एक चिंतनाचा व चर्चेचा विषय राहिला आहे. ह्या विषयीची विविध मतेही प्रचलित आहेत. यासंदर्भात बौद्ध पंडित राहुल सांस्कृत्यायन ह्यांच्या मतानुसार आद्य शंकराचार्यांच्या कार्यामुळे बुद्धधर्माचा र्‍हास झाला, ही एक मोठीच भ्रांतिमूलक धारणा आहे. कारण त्यांच्या मते शंकराचार्यांच्या जीवनकाळानंतर 12 व्या शतकांपर्यंत आणि त्यांची जन्मस्थली केरळमध्ये सुद्धा बुद्धधर्माचे लक्षणीय अस्तित्व कायम होते. सांस्कृत्यायन ह्यांनी बुद्धधर्माच्या र्‍हासासाठी प्रामुख्याने तत्कालीन विदेशी बर्बर अशा मुस्लिम आक्रमकांना जबाबदार धरले आहे. “फिर बौद्ध धर्म भारत में नष्ट कैसे हुआ? तुर्को का प्रहार जरूर ऊसमे एक मुख्य कारण बना। मुसलमानों को भारत से बाहर… बौद्धों का मुकाबला करना पडा। बुतपरस्त (बुद्धपरस्त) भिक्खुओं से वे पहले ही से परिचित थे। उन्होने भारत में आकर आपने बौद्ध शत्रुओं से जरा भी दया नही दिखाई। उनके बडे बडे विहार लूट कर जला दिए गए, भिक्खुओं के संघाराम नष्ट कर दिए गए।…. इस प्रकार भारत में तुर्कों के पैर रखने के एक डेढ शताब्दियों में ही (बौद्धधर्म) लुप्त हो गया।” (पृ. 68, बौद्ध संस्कृति, सम्यक प्रकाशन, 2011) आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली ही आपली भारतीय विचारधरोहर असलेल्या, एकूणच भारतीय मानसाला स्वीकार्य असणार्‍या व भगवान बुद्धाच्या अवताररूपात पूर्वीच समाजाने स्वीकार केलेल्या बुद्ध धर्माचे एका नव्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परिप्रेक्ष्यांत पुनरुज्जीवन केले आणि भारत राष्ट्रासाठी एक नवा एकात्मतेचा, समरसतेचा, समन्वयाचा आणि सुसंवादाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे धम्माचे जीवनशास्त्र समजून घेताना बाबासाहेबांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ह्या बुद्धविचारांच्या संकलनाला मध्यवर्ती स्थान आपोआप प्राप्त होते. धम्मपदातील सूत्रांच्या आधारे विनोबांनी मांडलेला बुद्ध धम्मविचारांचा मध्यवर्ती आशय आणि बाबासाहेबांनी प्रतिपादन केलेली ही तत्त्वे एकच असल्याचे लक्षात येते. ह्याच आधारे धम्माचे जीवनदर्शन अथवा धम्माने सांगितलेली जीवनमूल्ये आधुनिक काळात जगणार्‍या मनुष्याला कशी आणि कितपत मार्गदर्शक ठरू शकतात ह्याचाही शोध अनायास समोर येऊन उभा ठाकतो.

धम्म म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. बाबासाहेब म्हणतात- जीवन-शुचिता राखणे म्हणजे धम्म होय. (पृ. 149) शुचिता म्हणजे पवित्रता. हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होतो. त्याला त्याची ‘देहशुचिता’ म्हणतात. असत्य भाषणापासून विरत होणे म्हणजे वाक्शुचिता. सर्व मानसिक दुःस्थितींचा उद्गम कसा होतो. त्याचा त्याग कसा करता येतो. आणि तदविरहित चित्तस्थिती कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजे मानसिक शुचिता. जो काया, वाया, मने पवित्र आहे, निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे. त्याला लोक निष्कलंक म्हणतात. बुद्ध धम्माच्या जीवनशास्त्रात वर्णन केलेले हे वैयक्तिक आणि सामाजिक आचरणाचे नियम प्रत्यक्ष मानवी जीवनात व्यवहार्य करणे वाटते तितके सोपे नाही. कुठल्याही पंथाचे, धर्माचे वा विचारधारेचे अनुसरण करणार्‍या मनुष्यास ही जीवनमूल्ये लागू होतात. त्यामुळे बुद्ध धम्मात विशेषत्वाने आचारधर्म म्हणून प्रकट झालेली व आग्रहाने प्रतिपादन करण्यात येणारी ही सर्व प्रकारची संतमहंतांनी व महापुरुषांनी कथिलेली व आपल्या स्वतःच्या आयुष्यात बाणविलेली सार्वत्रिक जीवनमूल्ये ठरतात.

‘अ-धम्म’ म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तरात बुद्धधम्माने नाकारलेल्या पूर्ववर्ती भारतीय तत्त्वज्ञानातील विविध संकल्पनांची मांडणी बाबासाहेबांनी बुद्धविचारांच्या आधारे एकत्र संकलित केली आहे. आज एकविसाव्या शतकात त्या मांडणीची आवश्यकता व अनावश्यकता दोन्ही गोष्टी समजून घेता येऊ शकतात. ह्या प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीविषयी विद्वानांमध्ये उदा. विवेकानंद, राधाकृष्णन, विनोबा, गांधीजी, नेहरू, इत्यादी जे विचारवंत हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञानांची तुलना करून त्यातील समानतांचा शोध घेतात व त्याची समन्वयशील मांडणी करतात त्यांचेही विचार समजून घेणे इष्ट ठरते.

दैवी चमकृतीवर विश्वास ठेवणे, ईश्वरावर विश्वास, ब्रह्मसायुज्यावर आधारित धम्माची कल्पना, आत्म्यावरील विश्वास, यज्ञयागावर विश्वास, काल्पनिक अनुमानांवर आधारलेल्या धर्मावर विश्वास, धर्मग्रंथांच्या केवळ पठणावर विश्वास, धर्मपुस्तकांना प्रमादातीत मानणे, इत्यादी गोष्टींना बुद्ध धम्माच्या शिकवणुकीत स्थान नाही व तसेच ह्या गोष्टी बुद्धधम्माने नाकारल्या आहेत व त्यास ‘अ-धम्म’ मानले आहे. अशी मांंडणी बाबासाहेब करतात. ही मांडणी विविध विचारवंतांच्या विचारांच्या आणि बुद्धतत्त्वज्ञानातील महायान व हीनयान ह्या विविध पंथांच्या इतिहासाच्या परीप्रेक्ष्यांत बघावी लागते. त्यामुळे पंचशील आणि अष्टांगमार्ग ह्या बुद्धधम्मातील मनुष्याला व एकूणच समाजाला उत्तम चारित्र्याची व सद्गुणांची स्पष्ट दिशा दाखविणार्‍या विचारांवर लक्ष केंद्रीत करणे इष्ट ठरते. उलट, ईश्वर, आत्मा इत्यादी संकल्पनांविषयी बुद्धधम्माचे तत्त्वज्ञान ‘अज्ञेयवादी’ स्वरूपाचे मानणेच इष्ट ठरते. त्यामुळे अकारण वाद उत्पन्न करणारी कटुता टाळता येऊन समाजात समता, समानता व समरसता ह्या मूल्यांना अनुकुल वातावरण तयार करता येऊ शकते. धम्म तेव्हाच सधम्म असतो, जेव्हा तो प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री ह्या जीवनमूल्यांची शिकवण देतो, तसेच माणसाचे मोठेपण तो जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवतो आणि माणसामाणसांतील समतेच्या भावनेची अभिवृद्धी करतो. (पृ. 188 ते 209, बुद्ध आणि त्यांचा धम्म) हेही महत्त्वाचे व मध्यवर्ती सूत्र मानायला हवे.

‘धम्म’ आणि ‘धर्म’ म्हणजे रिलिजन वेगळे असून ‘प्रज्ञा आणि करुणा’ ही धम्माची दोन प्रधान तत्त्वे आहेत, अशी धम्माची व्याख्या बाबासाहेब करतात. (पृ. 213) इथे आपल्या लक्षात येते, की भारतीय धारणा-विचारांमध्ये जी ‘धर्म’ शब्दाची व्याख्या व्यापक ‘प्राणिनामं अभ्युदय नि:श्रेयस हेतुः स धर्मः’ अशाप्रकारे सर्व प्राणिमात्रांचे समग्र कल्याण व त्यासाठीचे नीतिनियम वा जीवनमूल्ये ह्या अर्थाने केली जाते तीच ‘धम्मा’च्या आशयपरिघाचा मध्यवर्ती भाग आहे. उलट भारताबाहेरील जगात इस्लाम व ख्रिश्चॅनिटीच्या परीप्रेक्ष्यांत जी विशिष्ट एकच एक प्रेषित व धर्मग्रंथांच्या दुराग्रहाची, विशिष्ट उपासनापंथाची जी व्याख्या व जे प्रतिपादन केले जाते ते त्या भारताबाहेरील धर्ममतांना लागू होते. भारतीय धार्मिक दर्शनांना मात्र ते लागू होत नाही. उलट धम्माची व्यापकता ‘धर्म’ संकल्पनतेही अनुस्युतजी असून त्याच अर्थाने हे दोन्ही शब्द भारतीय चिंतन परंपरेत वापरले गेेलेले स्पष्ट दिसतात. त्यामुळे अशा ठिकाणी विवाद्यता स्पष्ट दिसते, जी सहजतेने टाळता येऊ शकते, टाळली जायला हवी! आणि हेच खरे तर धम्माच्या जीवनशास्त्राचा, प्रत्यक्ष मानवी नातेसंबंधांच्या आणि सामाजिक सौहार्दपूर्ण संबंधांचा विचार करता योग्य ठरते. ह्या सर्व गोष्टींकडे विनोबाजी, गांधीजी ज्याप्रमाणे वैयक्तिक विशुद्ध नैतिक आचरणाच्या अराजकीय अंगाने बघतात आणि ‘धम्मपदाचा’, अथवा ‘पंचशीलाचा’ अथवा ‘अष्टांगमार्गाचा’ विचार करतात आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनमार्गासोबतच आपल्या मागोमाग येऊ इच्छिणार्‍या समाजालाही विशिष्ट आचरणमार्गाची दीक्षा देतात. मला वाटते हेच खरे तर ‘बुद्ध धम्माचे जीवनशास्त्र’ मानले पाहिजे. वैयक्तिक आचरणाच्या पातळीपासून ते राजकीय-सामाजिक सौहार्दपूर्ण स्तरापर्यंत धम्माच्या प्रत्यही कठीण वाटणार्‍या परंतु एकेका व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या विशुद्ध नीतिमान जगण्यासाठी एक सरल चौकट प्रदान करणार्‍या ह्या सर्वसमावेशक जीवनशास्त्राची गरज आज कधी नव्हे एवढी समाजाला असल्याचे प्रतीत होते.

‘बौद्ध जीवनमार्ग’ ह्या शीर्षकांतर्गत ‘बुद्ध आणि धम्म’ च्या चौथ्या खंडातील तिसर्‍या भागात काहीएक विवेचन बाबासाहेबांनी बुद्ध-विचारांच्या आधारे केले असून ते आजच्याही काळात सर्वच पंथ-संप्रदायाच्या, पक्षोपक्षांच्या व विचारधारांच्या मंडळींनी लक्षात घेण्यासारखे आहे. ह्यामध्ये प्रत्यक्ष बौद्ध जीवनमार्गाची विविध सूत्रे स्पष्ट करताना ते म्हणतात-

1. शुभकार्य करणे, अशुभ कर्मात सहयोगी न होणे व पापकर्म न करणे.

2. लोभ आणि तृष्णा ह्यांच्या आहारी जाऊ नका.

3. कुणालाही क्लेश देऊ नका व दुसर्‍यांसंबंधी द्वेषभावना बाळगू नका.

4. मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका.

5. सन्मार्गावर वाटचाल करावयास मनाची साधना हे पहिले पाऊल होय. अशा चंचल मनाचे दमन करणे उत्तम.

6. मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे, त्यामुळे जो स्वतःचा संयम करील तर तो दुर्लभ विजय प्राप्त करील.

7. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा.

8. प्रत्येक कार्य करताना जागरुक रहावे, प्रत्येक कार्य विचारपूर्वक करावे, प्रत्येक बाबतीत अप्रमादी आणि उत्साही असावे.

9. प्रमादाच्या अधीन होऊ नका. कामभोगामध्ये फसू नका. अशा अप्रमादी माणसालाच ध्यानाचा लाभ मिळतो.

10. उच्च राहणीमानावर नव्हे तर उच्च आचरणावर सुख अवलंबून असते.

11. खोटे बोलू नये, खोटे बोलण्यास दुसर्‍याला प्रवृत्त करु नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे.

12. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. आर्य-अष्टांगिक मार्ग हा श्रेष्ठतप मार्ग, सर्वश्रेष्ठ सत्य चार आर्यसत्ये, सर्वश्रेष्ठ धर्म विराग होय.

13. सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा करू नका. सन्मार्गाने जाणारे इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात.
(पृ. 238 ते 252, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’)
अशाप्रकारे ही १३ सूत्रे मांडलेली असून “हाच बौद्ध जीवनमार्ग होय.” असे मत सर्वत्र पुनरावृत्त करण्यात आले आहे. विविध विषयांच्या संज्ञांच्या व संकल्पनांच्या अंतर्गत तेच विचार वेगवेगळ्या शब्दावलींत पुनरावृत्त झालेले दिसतात. त्यातून सर्वसाधारणपणे सर्व धर्म-पंथांनी सांगितलेली आदर्श जीवनाची सूत्रे वारंवार प्रकट होताना दिसतात. ह्या बौद्ध जीवनमार्गाचे अनुसरण करणे जगातील अच्चयावत सर्वच प्राणीमात्रांसाठी (केवळ बुद्धधर्मीयांसाठी नव्हे!) आदर्श ठरते. ही एक प्रकारची सार्वत्रिक आणि सार्वकालिक अशी मानवतेची जीवनमूल्ये आहेत, हाही प्रत्यय सतत येत राहतो. धम्माच्या जीवनशास्त्रातील ह्या जीवनमूल्यांचे चिंतन करताना अवतीभवतीच्या भारतीय धारणाविचारांतील चिंतनसूत्रे समांतरपणे आपल्या पुढे येत राहतात. आणि सतत विचारांच्या क्षेत्रातील एक सुसंवादाची व समन्वयाची सम्यक वाट प्रशस्त करीत जातात. ज्ञानेश्वरीच्या तिसर्‍या अध्यायात विविध लोकसंस्थांच्या आदर्श व आवश्यक स्थितीचे वर्णन करतात संत ज्ञानदेव म्हणतात- “जे पुढती पुढती पार्था। हे सकळ लोकसंस्था। रक्षणीय सर्वथा। म्हणवुनिया॥ मार्गाधारे वर्तावे। विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे लोकाप्रति॥ तया लोकसंग्रहालागी । वर्तता कर्मसंगी। तो कर्मबंधु आंगीं वाजेलना॥ (अध्याय 3, ओवी क्र. 170, 171 व 175) ह्यात दिसणारी जीवनदृष्टी आणि धम्माची जीवनदृष्टी ह्यातले साम्य लक्षणीय म्हटले पाहिजे. विनोबांनी ‘धम्मपदा’चे पालीतून मराठी भाषांतर करताना व त्यावर भाष्य करताना, त्याचप्रमाणे विचार मांडले आहेत. त्या समन्वयशीलतेच्या प्रकाशात आज हे धम्म-जीवनशास्त्र बघितले पाहिजे. त्यात ते वेगळ्याच समावेशक विचारांनी उजळून निघालेले दिसून येते. विनोबा म्हणतात- “….मी गीतेच्या स्थितप्रज्ञ-दर्शनावर व्याख्याने दिली. ती समाप्त करताना मी वेदान्त आणि बौद्ध दर्शन यांच्या अंतिम ध्येयांची एकरूपता दर्शविण्याचा प्रयत्न केला. इकडे ज्ञानदेव, कबीर, नानक इत्यादि संतांची शिकवण आणि तिकडे उपनिषदे व गीतेची शिकवण ह्या दोहोंच्या मध्ये ‘धम्मपद’ मला एक जोडणारा सांधा वाटला आणि त्या दृष्टीने मी धम्मपदाचे अधिक सूक्ष्म अध्ययन केले. ही धम्मपदाची नवसंहिता वाचून पाठकांना प्रचिती येईल की यात थेट नव्याने समन्वय करण्याचा प्रश्न नाही, पूर्वीपासूनच समन्वय आहे, अर्थात् गौतम बुद्धाने स्वतःच तो करून ठेवलेला आहे. गौतम बुद्धाच्या पूर्वी भारतात ज्ञानी, ब्राह्मण आणि तपस्वी श्रमणांची एक परंपरा चालत आली होती. तिच्याविषयी अत्यंत आदर ठेवून गौतम बुद्धांनी आपले विचार मांडले आहेत. “जो समभावाने वागतो. जो शांत दमनशील संयमी आणि ब्रह्मचारी आहे, ज्याने दंड त्याग करून सर्व जीवांना अभय दिले आहे. तो ब्राह्मण आहे, तो श्रमण आहे, तो भिक्षु आहे.” (श्लोक 18-15) गौतम बुद्धांचा हा उद्गार त्यांच्या नम्र व सारग्राही दृष्टीचा पर्याप्त निदर्शक मानण्यात येईल.” (पृ. 7, प्रास्ताविक, धम्मपद, नवसंहित, परधाम प्रकाशन, पवनार, 1999) हे जे समन्वयशील मत व्यक्त केले आहे ह्यावर खरेतर वेगळे भाष्य करण्याचीही गरज नाही. पंचशीलाचे अथवा बौद्धदर्शनातील विविध विचारांचे पाठ करताना अवतीभवतीच्या समाजाप्रती वैरभाव, द्वेषभाव अथवा जातीय वा राजकीय दीर्घद्वेष्टी बुद्धी अत्रतत्र वापरणे म्हणूनच आधुनिक काळात एक मोठा विरोधाभास ठरू शकतो. ह्या पार्श्वभूमीवर विविध विचारप्रवाहातील समाजधुरीणांनी व चितकांनी बुद्ध धम्माच्या जीवनशास्त्राकडे वा त्यातून जगात प्रसवलेल्या सनातन, शाश्वत व नित्यनूतन अशा आदर्श मानवी जीवनमूल्यांकडे बघितले पाहिजे असे प्रकर्षाने जाणवत राहते. भगवान बुद्धाचे मोठेपण कथन करताना बाबासाहेबांनी पालीतील एक श्लोक उद्धृत केला असून त्यानेच प्रस्तुत लेखाचा शेवट करणे इष्ट ठरते.
“दिवा तपति आदिच्चो
रत्तिं आभाति चन्दिमा
सन्नद्धो खत्तियो तपति
झायी तपति ब्राह्मणो
अथ सब्बं अहोरत्ति
बुद्धो तपति तेजसा”
(पृ. 365, भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म)
(सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीच प्रकाशमान होतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजःपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस-रात्र सतत प्रकाशित राहतात.)

आचार्य सूर्यकांत भगत, ह्यांनी संपादित केलेल्या ‘बुद्धवन्दना’ या शीर्षकाच्या पुस्तिकेचा (सुधीर प्रकाशन, वर्धा, २००६) आधार घेतला आहे. ह्यामध्ये धम्मदीक्षा विधी, वन्दना, नमन, त्रिशरण, पंचशील, बुद्धवन्दना, धम्मवन्दना, संघवन्दना, बुद्ध पूजा, प्रासंगिक पूजा, रतनत्तय वन्दना, परित्राण पाठ सूत्र, आव्हान सुत्त, महामङ्गल सुत्त, रतनसुत्त, करणियमेत्रं सुत्त, महामङ्गल गाथा, जयमङ्गल अट्टगाथा, पुण्यानुमोदन, मत्तानिसंसं, आशीर्वाद गाथा, धार्मिक संस्कार (ह्यात विविध प्रकारचे संस्कार आणि विधींची माहिती) ह्यात सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ह्याशिवाय प्रामुख्याने ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले बुद्धविचारांचे संकलन आधारार्थ घेतले आहे. विनोबा भावे ह्यांचे ‘धम्मपद: नवसंहिता’ हे पुस्तक, राहुल सांकृत्यायन ह्यांचा ‘बौद्ध संस्कृति’ हा ग्रंथ आणि रामकृष्ण मठातर्फे प्रकाशित विवेकानंदांचे बुद्धधर्मविषयक विचार व इतर पुस्तिकांतून संकलित करण्यात आलेला बुद्ध धम्माचा तत्त्वविचार, ह्यांचा आधार ह्या लेखात घेतला आहे. ‘भगवान बुद्ध म्हणतात’ या (रामकृष्ण मठ, नागपूर, २००१) पुस्तिकेत ‘चार आर्यसत्ये’, ‘पंचशील’, ‘अष्टांग मार्ग’, ‘बुध्दचा उपदेश’ व ‘पुण्यकृत्ये’ ह्या पाच शीर्षकांतर्गत ज्या गोष्टी दिल्या आहेत] {पूर्वप्रसिद्धी : धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक, मुंबई तरुण भारत, दि. २५ ऑक्टोबर २०२०}