आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आणखी रेंगाळली

0

 

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आणखी रेंगाळली आहे. या प्रकरणाचा यावर्षी निकाल लागणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. आज या प्रकरणावर सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, या संभाव्य वेळापत्रक पत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धुसर असल्याने आता जानेवारी 2024 मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई होत असल्याने ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर अत्यंत कडक शब्दात सुनावले होते. त्यानंतर सुनावणीसाठी वेग आला आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाकडून कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. आजच्या सुनावणीनंतर सर्व दाखल याचिकांवर वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्व याचिकांवर एकाचवेळी सुनावणी घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.