
पुणे-राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या गौप्यस्फोटावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार करुन उत्तर दिले. (Supriya Sule reply to Chhagan Bhujbal) भुजबळांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी राजीनामा दिला होता, तो त्यांना द्यायचाच नव्हता. परंतु, या सगळ्यांचा आग्रह होता की आपण भाजपाबरोबर जायचे, या आग्रहामुळे शरद पवार दुखावले गेले होते. ते दुखावले गेल्यानेच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल पण आमच्यासाठी ते वास्तव होते, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केलाय.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर महाराष्ट्राची जनता, माध्यमे, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षातील सहकारी या सगळ्यांनी शरद पवारांना विनंती केली. भुजबळांनी देखील शरद पवारांना आग्रह केला तुम्हीच अध्यक्षपदी राहिले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. छगन भुजबळांमधला आणखी एक विरोधाभास दिसतो. एकीकडे ते म्हणतात की शरद पवारांनी आम्हाला वाट दाखवली, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात शरद पवार भाजपाशी चर्चा करत होते, तर कधी म्हणतात, शरद पवार हुकूमशाहसारखे वागायचे, पक्षावर वर्चस्व गाजवत होते, असे त्या म्हणाल्या.