
गेली अनेक वर्षे विविध सशस्त्र कारवायांनी समाजात भ्रांती तयार करत अराजक माजविणाऱ्या नक्षली चळवळीतील नेते सध्या या चळवळीच्या आगामी वाटचालीच्या मुद्यावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ही चळवळ आणि एकूणच माओवादी गट सध्या अंतर्गत मतभेदांनी ग्रस्त आहे. नक्षलवाद्यांच्या दोन गटांमध्ये, आगामी काळातील चळवळीच्या प्रवासाबाबत या शीर्षस्थ नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झालेले स्पष्टपणे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर या नेत्यांमधील आपसी मतभेद आता जाहीरपणे देखील व्यक्त होऊ लागले आहेत.
सशस्त्र लढा सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचं की यापुढे देखील सशस्त्र संघर्ष सुरूच ठेवायचा, या प्रमुख मुद्यावर तर या नेत्यांमधील मतभेद टोकाला पोहोचले आहेत. तेलंगणा राज्याच्या गुप्तचर विभागातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार हे दोन गट मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू आणि थिप्पिरी तिरुपती उर्फ देवुजी यांच्या नेतृत्वाखाली विभागले गेले आहेत. हे दोघेही कथित नेते तेलंगणातीलच आहेत.
- सोनू हा या चळवळीचा तात्विक (आदर्शवादी) नेता असून, तो सरकारपुढे शरणागती पत्करण्याच्या बाजुने आहे. तर देवुजी, जो सध्या पक्षाचा महासचिव आणि माजी सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख आहे, तो मात्र सशस्त्र लढा लढायचाच, असा हट्ट धरून बसला आहे.
नक्षलवाद्यांमधील या अंतर्गत फुटीची लक्षणं तीन वेगवेगळ्या पत्रांमधून स्पष्ट झाली आहेत, जी गत नजिकच्या काळात अल्पावधीतच समोर आली आहेत. पहिलं पत्र १५ ऑगस्ट रोजी लिहिलं गेलं आणि १७ सप्टेंबर रोजी जाहीर झालं. हे पत्र सोनूने लिहिलं होतं. त्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) “तात्पुरती शस्त्रास्त्र खाली ठेवण्यास तयार” आहे आणि केंद्र सरकारशी “शांतता चर्चेसाठी तयार” आहे असं म्हटलं होतं. त्यात त्याने हे देखील नमूद केलं होतं की, मरण पावलेले नक्षल चळवळीचे माजी महासचिव बसवराजू शरणागतीच्या बाजूने होते. “जागतिक आणि राष्ट्रीय परिस्थितीत झालेल्या बदलांचा, तसेच पंतप्रधान, गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात यावं अशा केलेल्या विनंत्यांचा विचार करून आम्ही शस्त्र सोडायला तयार आहोत,” असं त्यात नमूद होतं.
दुसरं पत्र १९ सप्टेंबर रोजी माओवादी पक्षाच्या तेलंगणा राज्य समितीकडून जाहीर झालं, ज्यात सोनूचं पत्र ही त्याची वैयक्तिक मतं असल्याचं सांगण्यात आलं. हे पत्र “जगन”, या राज्य समितीच्या प्रवक्त्याने सही केलेलं होतं. यानंतर तिसरं पत्र पक्षाच्या केंद्रीय समिती, पोलिटब्युरो आणि दंडकारण्य विशेष प्रादेशिक समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलं, ज्यात सोनूची भूमिका “देशद्रोह” असल्याचं म्हटलं गेलं. तिसऱ्या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, “दडपलेल्यांची फसवणूक करून शस्त्रास्त्र सोडून शत्रूच्या गोटात सामील होणं हे आमचं धोरण नाही.”
एका तज्ज्ञाने केलेल्या विश्लेषणानुसार, ही पत्रं कोणत्या पार्श्वभूमीतून लिहीली गेली आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या पत्रांमधून, नक्षलवाद्यांच्या दोन गटांच्या दोन विचारधारांमधील संघर्ष उघड होतो. त्यातील एक गट म्हणतो की, आता शस्त्र खाली ठेवण्याची वेळ आली आहे, तर दुसरा गट, शस्त्र खाली न ठेवता अधिक जोमाने लढण्याच्या भूमिकेत आहे.
- केंद्रीय समितीच्या ताज्या पत्रात असं म्हटलं आहे की, “आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेले अलीकडच्या काळातील बदल सशस्त्र संघर्ष सोडण्याचे संकेत देत नाहीत. उलट, ते सशस्त्र संघर्षाची गरज अधोरेखित करतात.
गुप्तचर सूत्रांनी सांगितलं, “देवुजीच्या आशीर्वादानेच हे केंद्रीय समितीचं पत्र जाहीर झालं असून, ते सशस्त्र संघर्ष सुरू ठेवण्याच्या बाजूने आहे. देवुजी, ज्याच्यावर १ कोटींचं बक्षीस आहे, तो मूळ तेलंगणातील जगितिअलचा आहे. तर सोनू, जो पेड्डापल्लीचा आहे, त्याच्यावरही १ कोटींचं बक्षीस आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या दोन गटांमधील संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. सोनूची पत्नी तारक्का हिने एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात शरणागती पत्करली, तर त्याचा भाऊ किशनजी याची पत्नी पी. पद्मावती हिने सप्टेंबरमध्ये तेलंगणात शरणागती पत्करली. २०२४ मध्ये पक्षाने एक पोलिटब्युरो दस्तऐवज प्रसिद्ध केला होता. ज्यात, पक्षाचे पाय कमजोर झाल्याचं मान्य करत “माघार घेणं” गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “पक्षाचा एक गट – जो त्याचा तात्विक आधार आहे – शरणागती आणि लोकशाही मार्ग स्वीकारण्याचा विचार करत आहे. दुसरा गट मात्र अजूनही सशस्त्र संघर्षाचा कट्टर समर्थक आहे. यापूर्वी अनेक सशस्त्र गटांनी लोकशाही मार्ग स्वीकारला आहे.
नक्षलवादी चळवळीतील ही फूट, सुरक्षा यंत्रणांच्या वाढलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर पडल्याचे म्हटले जात आहे. या चळवळीची एकेकाळी १९ सदस्य असलेली केंद्रीय समिती आता फक्त १० सदस्यांवर आली आहे. नक्षली चळवळीसमोर एक गंभीर संकट निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत चळवळीतील दोन गटांनी त्यावर दोन वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे. याचा सरळ अर्थ, नक्षलवादी चळवळीत उभी फूट पडली, असाच आहे.