
(Mumbai)मुंबई : टोल दरवाढीच्या मुद्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. (MNS Chief Raj Thakeray) टोलनाके बंद न केल्यास ते जाळून टाकू, असा इशारा ठाकरे यांनी दिला. ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली आहे. त्याविरोधात मनसे आमदार अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी उपोषणाला बसले होते, हे विशेष.
राज ठाकरे म्हणाले की (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटे बोलत आहेत. टोल हा काही काश्मीरचा विषय नाही.
टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू. टोलचे पैसे नेमके जातात कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येते ते पाहू. आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय आश्वासने दिली गेली होती, याचा लेखाजोखाही राज ठाकरे यांनी मांडला.