मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

0

११ पोलीस कर्मचारी सस्पेंड

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शनिवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या होत्य. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. शाईफेक करणार्‍या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या चेहर्‍यावरच शाईफेक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शिवाय पोलिसही या शाईफेकमुळे क्षणभर गोंधळले होते. शाईफेक करणार्‍या कार्यकर्त्याकडून घोषणाबाजीही करण्यात आली. चंद्रकांत पाटील सध्या एका माजी नगरसेवकाच्या निवासस्थानी थांबले आहेत. काही वेळातच ते मोरया गोसावी समाधी मंदिराच्या कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत, असे येथील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान कार्यकर्त्यांसह पोलिसांचाही या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात आहे.

दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही शाईफेक 

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर चंद्रकांत  पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून पोलिसांवर कारवाई न करण्याची विनंती

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. आता ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्री, ही सुरक्षा भेदून समता दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने एकच खळबळ उडाली होती. एवढी सुरक्षा असूनही चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत समता दलाचे कार्यकर्ते पोहोचलेच कसे, असा सवाल विचारला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.


चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा कार्यकर्ता नक्की कोण आहे? जाणून घ्या नेमकी माहिती


पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. पोलिसांनी तरी कुणा-कुणावर लक्ष ठेवायचं. माझ्यावर शाईफेक झाली त्यावेळी माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या पोलिसाचं निलंबन वगैरे मी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी हात जोडून विनंती करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, गृहखात्याकडून अवघ्या काही तासांमध्ये ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.