पोलिसांना पाहून त्यानं लाचेची रक्कम चक्क गिळली!

0

नवी दिल्ली : लाच प्रकरणात सापडू नये, यासाठी लाच घेणारे लोक बरीच सावधगिरी बाळगत असतात. मात्र, मध्य प्रदेशातील कटनी येथे विचित्र घटना उघडकीस आली आहे. लाच घेतल्यावर आपण सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच एका तलाठ्याने पाच हजार रुपयांची रक्कम चक्क गिळल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याने गिळलेली रक्कम बाहेर काढण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, त्यात यश आले नाही. या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी गजेंद्रसिंह याने त्याच्या खासगी कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच गेतली होती. मात्र, त्याचवेळी आपण पोलिसांच्या लाच सापळ्यात अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने गडबडीत हातातील रक्कम तोंडात कोंबली व ती चावून चावून गिळली. हा सापळा मध्य प्रदेशच्या लोकायुक्त विशेष पोलिस आस्थापनेकडून रचण्यात आला होता. या पथकाने तलाठ्याला जवळच्या रुग्णालयात नेले. गिळलेली रक्कम तेथे डॉक्टरांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. पोलिसांनी आरोपी तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मालमेचा तपास सुरू केला आहे.