
लहान मानला जाणारा राजकीय पक्ष मी मी म्हणणार्या राजकीय नेत्यांचे स्क्रू कसे टाईट करू शकतो याचे ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील मविआच्या जागावाटपात स्वतःच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे वठवित असलेल्या भूमिकेचा उल्लेख करावा लागेल.कदाचित हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा मविआचे जागावाटप झालेही असेल पण त्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश असेल हे ‘जाणते राजे’ वा ‘विश्वप्रवक्ते’ही ठामपणे सांगू शकणार नाहीत, अशी स्थिती सहा मार्च रोजी मुंबईत झालेल्या मविआच्या बैठकीपर्यंत होती.’ मी मविआसोबत आहे पण मविआ मात्र माझ्यासोबत नाही’ असे या बैठकीत सुनावून तर प्रकाश आंबेडकर यानी मविआतील बड्याबड्यांचे होशच उडवून टाकले.ते कमी वाटल्यामुळे की, काय त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी ‘मविआने आमच्या पक्षाच्या एखाद्या मागणीवरही अद्याप चर्चाच केली नाही’ असे सांगून आपल्या नेत्याची जागावाटप डिप्लोमसी अधोरेखित केली.
खरे तर रिपब्लिकन पक्ष या शब्दाच्या आगेमागे नेत्यांची नावे लावून महाराष्ट्रात आज दलित समाजाचे अनेक पक्ष काम करीत आहेत. त्यात प्रामुख्याने गवई गट, खोब्रागडे गट, प्रकाश आंबेडकर गट, बाबू हरिदास आवळे गट, रामदास आठवले गट यांचा समावेश आहे.कांशीराम वा मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपा हा वेगळा पक्ष आहेच.प्रत्येक गटाचे आपले एक प्रभावक्षेत्रही आहे. जो तो गट आपापल्या प्रभावक्षेत्रात मुख्य राजकीय पक्षांशी वाटाघाटी करीत असतो व काही गोष्टी पदरात पाडून घेत असतो पण त्या सर्वात वाटाघाटींसाठी ‘ हार्ड बार्गेनर ‘ म्हणून ओळखले जातात ते प्रकाश आंबेडकरच.ते स्वतः आपले उद्दिष्ट निश्चित करतात,आपले पत्ते कधीही उघडे करीत नाहीत आणि अतिशय कौशल्याने राजकीय पक्षाना वाकवतातही.मविआतील जागावाटपातही ते तीच भूमिका वठवून शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांना जेरीस आणत आहेत.
आपल्याला नेमक्या किती व कोणत्या जागा हव्यात हे प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप सांगितलेले नाही.परवा फक्त त्यानी अकोल्याच्या जागेचा उल्लेख केला पण तोही अप्रत्यक्षपणे.मात्र त्यांच्या पक्षाने सत्तावीस जागा मागितल्याचे किंवा सतरा जागा मागितल्याचे वृत्त जेव्हा सुत्राच्या माध्यमातून प्रसिध्द होते तेव्हा ते त्याचा इन्कारही करीत नाहीत.त्यांचा फक्त एकच आग्रह आहे व तो म्हणजे मविआने आपले जागावाटप करावे व आम्हाला किती जागा देणार हे सांगावे.पण आजपर्यंतही मविआने अधिकृतपणे ते सांगितलेले नाही.
प्रकाशजी तेवढ्यावरच थांबत नाहीत.मविआने ओबीसीना किती जागा द्याव्यात, मुस्लिम उमेदवार किती असावेत याची माहितीही त्याना मविआकडून हवी आहे.शिवाय निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत एनडीएला मदत करणार नाही असे लेखी आश्वासन त्याना काॅग्रेस,शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याकडून हवे आहे.
अनधिकृतपणे जे कळते ते असे की, मविआने 23 उबाठा,15काॅग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट 10 असे सूत्र तयार केले आहे.त्यातून प्रत्येक पक्ष एकेक जागा वंचितला देईल.पण हे अनधिकृत असल्याने त्या जागावाटपावर प्रकाश आंबेडकर विश्वास ठेवायला तयार नाहीत.मविआने जे काय सांगायचे ते अधिकृतपणे सांगावे असा त्यांचा हट्ट आहे. मविआला ते नऊ मार्चच्या बैठकीत सांगावेच लागणार आहे.
खरे तर मविआला प्रकाश आंबेडकराना एक दोन जागा जास्त दिल्या तरी फरक पडत नाही.त्यांचे आघाडीत असण्याचे महत्व अशासाठी आहे की, ते जर आघाडीत नसले तर मविआच्या अनेक जागा हातातून निसटू शकतात एवढे वंचितचे उपद्रवमूल्य नक्कीच आहे. ते होऊ द्यायचे काय हे शेवटी मविआलाच ठरवायचे आहे.
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर (L.T.Joshi
Senior Journalist Nagpur)