अकोल्यात दोन गटात दंगल, एकाचा मृत्यू, 10 जखमी

0

 

अकोला: सोशल मिडिया पोस्टवरून अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये दंगल उसळली. या संघर्षात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याचे प्रकार घडले. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली. या संघर्षात दोन्ही गटांमधील १० जण जखमी झाले. तर यात एकाचा मृत्यू झाला (Riot in Akola city over social media post) आहे. यात दोन पोलीसही जखमी झाल्याची माहिती असून शांतता राखण्यासाठी शहरातील अनेक भागांमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याचं सांगितलं जात आहे काही ठिकाणी चारचाकी गाड्यांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे एका भागांतून एक मोठा समूह चालून आला. या समूहाने संपूर्ण भागात दगडफेक आणि जाळपोळ करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटातील एकूण 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एका व्यक्तीने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचे सूत्रांनी सांगितले. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे.

अश्रूधुराचा वापर

अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी माहिती दिली की, शहरात गरजेच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवून गस्त घातली जात आहे. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे तसेच कुठेही गर्दी करू नये. नागरिकांना यासंबंधीची कोणतीही महिती असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी. शहरातल्या संमीश्र वस्ती असलेल्या भागात कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

चौकशीचे आदेश: फडणवीस

अकोल्याच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्रीपासून पोलिस महासंचालक तसेच अकोला पोलिसांशी संपर्कात होते.
आता परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असून शांतता आहे.
आतापर्यंत सुमारे 30 आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.