सरकारी रूग्णालयातील मृत्युंचेही राजकारण

0

 

मृत्यु मग तो कुणाचाही असो, कोणत्याही कारणाने व कुठेही आणि कसाही होवो, संबंधितांसाठी तो दुर्दैवी आणि क्लेषदायकच असतो. तो कुणाच्या हलगर्जीपणाने होवो वा दुष्ट हेतूने होवो, निषेधार्हच.पण कुठल्याही मृत्युचा जेव्हा केवळ राजकारणासाठीच वापर केला जातो तेव्हा तो प्रकारही तेवढाच निषेधार्ह ठरतो. हल्ली तेच राजकारण पुरोगामी म्हणविल्या जाणार्या महाराष्ट्रात होत आहे व तेही तेवढेच निषेधार्ह म्हणावे लागेल.

खरे तर मृत्यु मग तो कुठेही होवो, घरात होवो, सरकारी वा खासगी रूग्णालयात होवो, अपघातात होवो वा कुणी दुष्टबुध्दीने केलेल्या आघातात होवो तोही तेवढाच दुर्दैवी असतो.कारण अशा घटनांमध्ये माणसांचे प्राण जात असतात आणि आजच्याच नव्हे तर कोणत्याही काळात प्राणांचे मूल्य ठरविताच येत नाही.ती कधीही न भरून येणारी हानीच असते.त्याबद्दल सर्वानाच दुःख होत असते.हेतूपुरसर कुणाचा जीव घेण्यात कुणाला आसुरी आनंद होत असेलही पण जेव्हा उपचार सुरू असताना मानवी चुकांमुळे वा व्यवस्थेअभावी होणारे मृत्यु आणि आसुरी आनंद देणारे मृत्यु यात निश्चितच फरक असतो.आसुरी आनंद देणारे मृत्यु हे गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने ते रोखण्यासाठी कायदे आहेत आणि न्यायालयेही आहेत.कुणाच्या निष्काळजीपणामुळे होणार्या मृत्युंचीही चौकशी होऊन संबंधिताना शिक्षा देण्याची तरतूदही कायद्यात आहेच.पण त्या सर्व तरतुदींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून जेव्हा त्यावर केवळ आणि केवळ राजकारणच केले जाते तेव्हा तो प्रकार मृतांच्या टाळूवरील लोणी चाखण्यासारखा ठरतो.

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था मग ती सरकारी असो वा खासगी असो, अगदी निर्दोष वा परिपूर्ण आहे, असा दावा कुणीही करू शकत नाही.मलाही तो करता येणार नाही.त्यात अनेक दोष असू शकतातच.पैशासाठी हपापलेली स्वार्थी माणसे त्या व्यवस्थेत नाहीत असे कुणीही म्हणणार नाही.एकेकाळी डाॅक्टर म्हणजे देवाचा अवतार अशीच मान्यता होती.पण जसजसे विविध सेवांचे बाजारीकरण होत गेले तसेच आरोग्यसेवेचेही होत गेले.ते होण्याला थोडा उशीर झाला असेल पण त्यातून रूग्णसेवा सुटली असे म्हणता येणार नाही.पण त्यामुळे कुणालाही त्या स्थितीचे राजकारण करायला परवानगी देता येत नाही. राजकारण त्याज्यच आहे असेही कुणी म्हणणार नाही.तोही लोकशाही व्यवस्थेचा भाग आहे.पण तो एकमेव भाग आहे असे म्हणून त्याचे समर्थन करता येणार नाही.कारण समाजाची जी अनेक अंगे आहेत त्यातील राजकारण हे एक अंग आहे.ते कोणत्या क्षेत्रात करावे व कोणत्या क्षेत्रात करू नये याचे निकष काळाच्या ओघात निश्चित झाले आहेत.पण त्याच काळाच्या ओघात एकेक निकष गळत गेला आहे.व्यक्तिगत संबंधात राजकारण आडवे येणे अपेक्षित नाही.धार्मिक क्षेत्रात राजकारण शिरणेही अपेक्षित नाही. राजकारणाचा संबंध विकासासाठी, प्रशासनावर ताबा मिळविण्यासाठी , लोककल्याणासाठी निश्चितच होऊ शकतो. आज मृत्युंचे राजकारण करणारी मंडळीही आम्ही त्यासाठीच राजकारण करतो असा दावा करतील पण ज्या पध्दतीने ते होत आहे ती लक्षात घेता कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही.

सरकारी रूग्णालयांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा हा प्रकार सर्वप्रथम ठाणे येथील महापालिका रूग्णालयापासून सुरू झाला.तोही सवंगपणे.इतक्या तासात इतके रूग्ण दगावले असे सांगायचे व त्यावरून तेथील यंत्रणा कुजकी, भ्रष्ट, निष्काळजी असल्याचा, तेथे औषधांचा अपुरा पुरवठा असल्याचा वा औषधखरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करायचा व त्याचा ठपका तेथील पालक मंत्र्यांवर फोडायचा असा पॅटर्न राजकारण्यानी निश्चित केला व आरोपांची मालिका सुरू झाली.ठाणे असो वा नांदेड येथील यंत्रणा धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही.

भ्रष्टाचार वा गैरकारभार राज्यातील कुठल्याच सरकारी रूग्णालयात नाही असेही मला सूचित करायचे नाही.त्याबाबतीत सर्वच सरकारी जिल्हा रूग्णालये वा मेडिकल काॅलेजांशी संलग्न रूग्णालये थोड्या फार फरकाने सारखीच आहेत असे सहज म्हणता येईल.पण त्याना वठणीवर आणण्याचा राजकारण हा मार्ग असू शकत नाही.कारण या रूग्णालयांध्ये दाखल केल्या जाणार्या रूग्णांची स्थिती सारखीच नसते.तेथे वेगवेगळ्या वयांचे, वेगवेगळ्या आजारांचे रूग्ण दाखल केले जातात.सामान्यतः रूग्णाची स्थिती गंभीर झाल्यानंतरच रूग्णाला रूग्णालयात दाखल केले जाते. त्यांच्या आजाराचा स्तरही सारखाच असत नाही.अशा अवस्थेत केवळ इतक्या तासात इतके रूग्ण मृत्युमुखी पडले असे म्हणून रूग्णालयाच्या व्यवस्थेवर ताशेरे ओढायचे हे फार सवंगपणे केले जाते व त्यातून आपले राजकारण साधण्याचा प्रयत्न होतो.या पध्दतीचा आज सरकारी रूग्णालयांसाठी वापर केला जातो, उद्या तो खासगी रूग्णालयांच्या बाबतीत झाला तर आश्चर्य ठरणार नाही.

खरे तर आपल्या निरीक्षणाखाली असलेला रूग्ण मरावा असे कोणत्याही डाॅक्टरला वाटत नाही.प्रत्येक डाॅक्टरला घ्यावी लागणारी प्रतिज्ञा नजरेखालून घातली तरी डाॅक्टर रूग्ण यांच्यातील नाते स्पष्ट होते.शिवाय कोणत्याही रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रूग्णाच्या निकटच्या नातेवाईकाकडून एका ना हरकत पत्रावर त्याची सही घेतली जाते. अशा स्थितीत डाॅक्टराना किती जबाबदार समजले जावे हा प्रश्न निर्माण होतो.
रूग्णालयांच्या माध्यमातून राजकारण करणार्यानी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, अशा सवंगपणातून त्यांचे राजकारण भलेही साधेल पण त्यातून समाजातील गैरकृत्ये करणार्या तत्वांचे फावणार आहे.कोणत्याही कारणाने का होईना गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सौदेबाजी (ब्लॅकमेलिंग) करणार्यांचे, फसवाफसवी करणार्याचेही प्रमाण वाढत आहे.उद्या ती तत्वेही या परिस्थितीचा लाभ घेऊ शकतात.दररोज माध्यमांमध्ये प्रसारित होणार्या बातम्या पाहिल्या तर तसे प्रकार वाढीस लागल्याचा निष्कर्ष निघू शकतो.राजकारणी नेत्याना हे अभिप्रेत आहे काय?
खरे तर या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व सरकारी रूग्णालयातील व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय विधिमंडळ समितीची स्थापना करण्याची मागणी पुढे यायला पाहिजे पण राजकारणी मंडळी आरोप करून स्वस्थ बसण्यातच धन्यता मानतात अशी स्थिती आहे.

राजकारण्याना आपले राजकारण साधण्याचा मोह होण्याचे आणखी एक कारण आहे.ते म्हणजे राज्यातील अस्थिर राजकारण.2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनैतिकतेचे राजकारण सुरू झाले आहे.आज एकत्र असलेले पक्ष वा नेते उद्याही एकत्र राहतीलच याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही.त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांवर बेछूट आरोप करीत राहणे हाच एककलमी कार्यक्रम राजकारणी राबवत आहेत.त्यातूनच सरकारी रूग्णालये त्यांचे लक्ष्य बनत आहेत. आज त्यांना या मंडळीनी घेरले आहे, उद्या कोणत्या क्षेत्राला घेरतील हे सांगता येत नाही.’ म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो ‘ही उक्ती लक्षात ठेवून त्यानी आपले राजकारण करीत राहावे हीच अपेक्षा.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर .