विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना धक्का, पाटणा बैठक लांबणीवर

0

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांच्या एकजुटीला सध्यातरी मोठा धक्का बसला आहे. १२ जून रोजी पाटणा येथे होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलण्यात आली (Opposition parties Meeting in Patna postponed) आहे. काँग्रेसच्या नेत्यांना या तारखेला हजर राहणे शक्य नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. प्रत्यक्षात नितीशकुमार यांचे नेतृत्व काँग्रेसला पसंत नसल्याने काँग्रेसने त्यांना धक्का देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही बैठक तिसऱ्यांना रद्द करावी लागली आहे. आता विरोधी एकजुटीच्या बैठक कधी होणार, याबाबत निश्चित काहीही सांगता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधकांच्या देशव्यापी एकजुटीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी दौरे काढून विविध पक्षांच्या नेत्यांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. १२ जून रोजी पाटणा येथे विरोधकांच्या एकजुटीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीची बरीचशी तयारी देखील पूर्ण झाली होती, असे सांगण्यात येते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी या तारखेला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली. सोनिया गांधी या उपचारांसाठी परदेशात आहेत. प्रियांका गांधी त्यांच्यासोबत आहेत. राहुल गांधीही विदेश दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे हे देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेसकडून करण्यात आली होती. प्रत्यक्षात यामागे काँग्रेसचे राजकारण असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य नाही. कर्नाकटमध्ये विजय मिळालेल्या काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून काँग्रेसचा विश्वास दुणावला आहे.