
महानिर्मिती व्यक्ती विशेष
(Bhusawal)भुसावळ विद्युत केंद्र परिसरात २४३ पेक्षा जास्त पक्षी प्रजातींसह समृद्ध जैवविविधता
निसर्गाने कायम मानवाला नि:स्वार्थपणे भरभरून दिले आहे. आपणही निसर्गाचे देणं लागतो ही भावनाच मुळी अत्यंत सकारात्मक आणि महत्वाची ठरते. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि शहरीकरणाने नैसर्गिक संपदेचा ऱ्हास होत असून वातावरण बदल, अवेळी पाऊस, नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतोय हे अलीकडच्या काळात आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे आपल्या आवडीनुसार प्रत्येकाने नैसर्गिक संवर्धनासाठी जाणीवपूर्वक शक्य तेवढे योगदान देणे काळाची गरज बनली आहे. आज अनेक संस्था, व्यक्ती निसर्ग संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा देत आहेत मात्र ही संख्या फारच कमी आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत (Mr. Laxmikant Neve)श्री. लक्ष्मीकांत नेवे यांनी वीज उत्पादनाचे कार्य चोख बजावत पक्षी निरीक्षणाचा विलक्षण छंद जोपासला आहे. त्यांचे निसर्ग संवर्धन ,पक्षी निरीक्षण आणि पक्षी अभ्यासकाच्या माध्यमातून असलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.
पक्षी निरीक्षणासाठी प्रामुख्याने आवड असायला हवी म्हणजे निसर्गाचा आनंद उपभोगता येतो. श्री. लक्ष्मीकांत नेवे यांनी भूसावळ औष्णिक विद्युत केंद्र परिसराची पक्षी निरीक्षणासाठी निवड करून मागील सात-आठ वर्षांच्या नोंदी केल्या आहेत. या नोंदी ‘eBird’, ‘iNaturalist’ या सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत हे विशेष. ईशान्य भारत आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये वावरणारा “रेषाळ गवती वटवट्या” या दुर्मिळ पक्षाची भुसावळला नोंद झाली आहे. या पक्षाला बघायला संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षी अभ्यासक भुसावळ ला येत असतात. नोंदीमुळे संशोधकांना-अभ्यासकांना फार फायदा होतो. कोणती पक्षी प्रजाती कुठे, किती संख्येने आणि कधी बघितली? या दृष्टीने अभ्यासकांना फार सोयीचे होते. दीपनगरच्या परिसरात २४३ पेक्षा जास्त पक्षी प्रजाती असून त्यात स्थलांतर करून येणाऱ्या ८३ पक्षी प्रजाती आहेत. त्यातील दोन पक्षी प्रजाती धोकाग्रस्त असून ३४ पक्षी प्रजातींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांना अभ्यासा अंती लक्षात आले. या सोबतच भुसावळ वीज केंद्र परिसरात जैवविविधतेवर त्यांचे नियमित काम सुरु आहे. पक्षी, पक्षांबद्दल जागृती, सेमिनार, वेबिनार, कार्यशाळा, चित्र प्रदर्शनी, फिल्ड व्हिजीट, पक्षी आणि फुलपाखरू ट्रेल वॉक सारखे उपयुक्त उपक्रम श्री. नेवे घेत असतात. भुसावळला दोन-तीन दिवस राहायला गेल्यास ते तुम्हाला पक्षी मित्र बनवू शकतात.
तसेच दीपनगर परिसरातच मारूती मैदान नावाची पाणथळ जागा तयार झाली असुन याठिकाणी सर्पगरूड, मधुबाज यासारखे शिकारी पक्षी दिसायला लागले आहेत. फक्त याच पाणथळीवर १४६ पक्ष्यांची नोंद झालेली असुन ४८ पक्ष्यांची विण येथे होत असते. अडई,जांभळा बगळा, पाणलावा, पांढऱ्या छातीची कोंबडी, जांभळी पाणकोंबडी, तापस या पाणपक्ष्यांची येथे विण झालेली आहे. याशिवाय पंचभुतांपैकी एक म्हणजे पाण्याची व्यवस्था मुबलक पावसाने झाल्याने येथे प्रथम पक्षी आले आणि त्यांनी आपल्यासोबत अनेक प्रजातीही आणल्यात ४५ + फुलपाखरे, १७ सर्प प्रजाती, दोन प्रकारची कासवे, जंगली ससा, असंख्य किटक प्रजाती, औषधी वनस्पती यासर्व संसारासह पक्षी या पाणथळ जागेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. औष्णिक केंद्र परिसरातच असलेली ही पाणथळ जागा जैवविविधतेचे ऊत्तम ऊदाहरण ठरत आहे आणि जैवविविधतेची ऊत्तम साखळी येथे तयार झालेली आहे. त्यामुळे यांचे संगोपन होणे तितकेच गरजेचे आहे. औष्णिक विद्युत केंद्र परिसरातील ही जैवविविधता पर्यावरण प्रेमींसाठी आनंददायी बाब आहे.
हा छंद कुठेही, कमी खर्चात जोपासता येतो. पक्षांचे आवाज, खाण्याच्या सवयी, नातेसंबंध, प्रेमसंबंध असतात हे त्यांच्या लक्षात आले. पक्षी निरीक्षण, अभ्यास, नोंदी, पक्षांच्या सवयी, पक्षी छायाचित्रण, चलचित्रण, आवाजांचा अभ्यास, गळलेल्या पिसांचा अभ्यास, पक्षांचे शरीरशास्त्र, स्थलांतर, विणीचा हंगाम, पक्ष्यांची अन्नसाखळी, पक्षी आणि निसर्ग घटके, पक्षांचा अधिवास, आरोग्य, संगोपन आणि प्रथमोपचार इत्यादी विषयक त्यांना तपशीलवार अनुभव आला आहे. आपला हा छंद इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून श्री. लक्ष्मीकांत नेवे यांनी पक्षीजगत नावाने वृत्तपत्रीय सदर सुरु केले होते. आयुष्यात आपण पक्ष्यांचा अभ्यास करू याची त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती. मात्र, थोड्या जंगलभ्रमंतीनंतर विविधरंगी पक्षी खुणावू लागले आणि पक्षीनिरीक्षणाची ओढ लागली. नियमित पक्षीनिरीक्षणातून सामान्य माणूसही पक्ष्यांचा अभ्यास करू शकतो. वर्तमान पिढीने “काऊ-चिऊ” घरात अंगणात पाहिली अनुभवली त्याचप्रमाणे भावी पिढीला देखील “काऊ-चिऊ” पहायला अनुभवायला मिळावी यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. निसर्ग संवर्धनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महानिर्मितीच्या या ध्येयवेड्या अभियंत्यास तसेच पक्षी अभ्यासकाच्या उत्तुंग कार्यास त्रिवार सलाम.
अधिक माहिती तथा संपर्कासाठी
श्री.लक्ष्मीकांत नेवे
सहाय्यक अभियंता
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र
मोबाईल -8149659353