यावर्षी १८ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत श्रावण हा ‘ अधिक महिना ‘ आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळी हे सण उशीरा आले आहे. इंग्रजी कालगणना आणि हिंदू कालगणना यांचा सुंदर मेळ या अधिक महिन्याने बसविण्यात आला आहे. इंग्रजी कालगणना ही ‘ सौर कालगणना ‘ तर हिंदू कालगणना ‘ चांद्र कालगणना ‘ आहे. परंतु हिंदू कालगणनेचा मेळ सौर कालगणनेशी बसविण्यात आल्याने हिंदू कालगणनेला ‘ चांद्र- सौर’ कालगणना म्हटल्या जाते. This year, Shravan is the ‘plus month’ from July 18 to August 16. Due to this, Dussehra and Diwali festivals have come late. A beautiful combination of English chronology and Hindu chronology is fitted with this extra month. English chronology is ‘solar chronology’ while Hindu chronology is ‘lunar chronology’. But since the Hindu chronology is aligned with the solar chronology, the Hindu chronology is called ‘lunar-solar’ chronology.
पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास सर्वसाधारणपणे ३६५ दिवस, ६ तास लागतात (३६५ दिवस, ५ तास ५६ मिनीटे, ४.०९ सेकंद). म्हणून आपण इंग्रजी वर्ष ३६५ दिवसाचे मानतो. दरवर्षीचे जास्तीचे ६ तास असे ४ वर्षाचे २४ तास म्हणजे एक दिवस आपण दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात वाढून देतो. तेव्हा वर्ष ३६६ दिवसाचे असते. या वर्षाला ‘ लीप वर्ष ‘ म्हणतात.
चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २९ १/२ (साडेएकोणतीस) दिवस लागतात. म्हणून हिंदू कालगणनेत २९ १/२ दिवसाचा एक महिना. याला ‘ चांद्रमास ‘ म्हणतात. असे १२ महिन्याचे ३५४ दिवस होतात. याला ‘ चांद्रवर्ष ‘ असे म्हणतात.
इंग्रजी वर्ष (सौरवर्ष) ३६५ दिवसांचे तर हिंदू कालगणनेतील वर्ष (चांद्रवर्ष) ३५४ दिवसांचे असते. म्हणजेच सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये एका वर्षाला ११ दिवसाचा फरक पडतो. चांद्रवर्ष सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान भरते. या कमी कालावधीतमुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा वर्षारंभ एका विशिष्ट तारखेला येत नाही. दरवर्षीचा गुढीपाडवा हा आदल्या वर्षीच्या गुढीपाडव्यापेक्षा ११ दिवस अगोदर येतो. उदा. २०२२ मध्ये गुढीपाडवा २ एप्रिलला होता तर २०२३ मध्ये २२ मार्चला आला. तसेच आपले सण हिंदू कालगणनेवर आधारित असल्याने दरवर्षी प्रत्येक सण आदल्या वर्षीच्या सणापेक्षा ११ दिवस अगोदर येतात. उदा. दिवाळी २०२० मध्ये १४ नोव्हेंबरला होती तर २०२१ मध्ये दिवाळी ४ नोव्हेंबरला, २०२२ मध्ये २४ ऑक्टोबरला आली. याप्रमाणे दिवाळी दरवर्षी ११ दिवस अगोदर म्हणजे कधी हिवाळ्यात कधी पावसाळ्यात तर कधी उन्हाळ्यात येईल. परंतु असे होत नाही. आपल्या पूर्वजांनी सौर कालगणना आणि चांद्र कालगणना यांचा मेळ बसविण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे.
सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांचा एका वर्षातील फरक ११ दिवसाचा असतो. हा फरक २ वर्षे ८ महिन्यांनी ३० दिवस म्हणजे एक महिना इतका होतो. त्यामुळे हिंदू कालगणनेत दर २ वर्षे ८ महिन्यांनी एक ‘ अधिक महिना ‘ मानला जातो. कोणता महिना अधिक महिना मानायचा याचे देखील एक ठराविक तत्व आहे. साधारणतः प्रत्येक चांद्रमासात सूर्याचे एकदा राशीसंक्रमण होते. म्हणजे सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत जातो. परंतु सौरमास ३० १/२ दिवसाचा तर चांद्रमास २९ १/२ दिवसाचा. यामुळे एक चांद्रमास असा येतो की, त्यात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही. तो महिना अधिक महिना मानतात.
यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये श्रावण हा अधिक महिना आहे. त्यामुळे दिवाळी २०२२ मध्ये २४ ऑक्टोबरची होती ती यावर्षी २०२३ मध्ये ११ दिवस अगोदर म्हणजे १३ ऑक्टोबरची येणार नाही तर ती अधिक महिन्यामुळे १२ नोव्हेंबरला आहे. परंतु पुढील वर्षी २०२४ मध्ये दिवाळी ११ दिवस अगोदर १ नोव्हेंबरला येइल.
हिंदू कालगणना चंद्राच्या गतीवर आधारीत असली तरी तीचा मेळ सौरवर्षाशी बसविण्यात आल्याने हिंदू कालगणनेला चांद्र – सौर कालगणना असे म्हणतात.
मुस्लिम कालगणना पुर्णतः चांद्र कालगणना आहे. म्हणजे मुस्लिम कालगणनेत ३५४ दिवसाचेच एक वर्ष मानले जाते. परंतु मुस्लिम कालगणनेत अधिक महिना नसल्याने वर्षारंभ दरवर्षीच ११ दिवस अगोदर येतो. उदा. २०२२ मध्ये मुस्लिम नूतन वर्षारंभ म्हणजे हिजरी सन (१४४४) ३१ जुलै रोजी प्रारंभ झाले. तर २०२३ मध्ये २० जुलै रोजी मुस्लिम नूतन वर्षारंभ हिजरी सन (१४४५) प्रारंभ झाले. अशा त-हेने मुस्लिम वर्षारंभ, सण, उत्सव दरवर्षीच ११ दिवस अगोदर येतात. त्यामुळे वर्षारंभ मोहरम कधी उन्हाळ्यात कधी पावसाळ्यात तर कधी हिवाळ्यात येतो.
संजीव विश्वनाथ भुयार
भूगोल विभाग
महिला महाविद्यालय,
चांदूर रेल्वे.जि.अमरावती
(९७६५४९६६५६)