खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीनंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागणार

0

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे ‘ऑन द स्पॉट’ आदेश

चंद्रपूर (Chandrapur):- जिल्हा नियोजन विकास समितीच्या (DPDC) बैठकीत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अनेक अत्यंत महत्त्वाचे आणि ज्वलंत मुद्दे अत्यंत प्रभावीपणे उपस्थित केले. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे ‘ऑन द स्पॉट’ आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून, हे सर्व प्रश्न लवकरात लवकर निकालात काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांनी यावेळी सांगितले की, स्वस्त धान्य दुकानांत मिळणाऱ्या तांदळा संदर्भात मोठा घोटाळा असून, शासनाकडे विविध वाणांचे तांदूळ उपलब्ध असताना, सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये एकाच वाणाचा तांदूळ उपलब्ध असतो, याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यासोबतच, डीपीडीसीमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या ३ टक्के राखीव निधीतून मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सॅनिटरी व पॅड डिस्पोजेबल मशीन लावण्यात यावी. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात स्थानिक नागरिकांसाठी प्रवेश शुल्क कमी करण्यात यावे, जेणेकरून स्थानिकांना या प्रकल्पाचा लाभ घेता येईल, अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी केली.

स्वस्त धान्य दुकानांतील तांदूळ घोटाळ्याची चौकशी, मोफत शववाहिका, ई-बसेस खरेदी

याशिवाय, शासकीय महाविद्यालयांतून उपचारादरम्यान मृत पावलेल्या रुग्णांना घरापर्यंत पोहोचविण्याकरिता मोफत शववाहिका जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करून उपलब्ध करून द्यावी. पडोली ते पठाणपुरा, जुनोना चौक ते गांधी चौक मार्गे दुर्गापूर, बंगाली चौक ते नवीन चंद्रपूर तसेच बंगाली कॅम्प ते एमआयडीसी या नवीन शहरांतर्गत धावणाऱ्या ई-बसेस जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी कराव्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याकरिता व ग्राहकांना थेट योग्य माल मिळण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून धान महोत्सव डिसेंबर महिन्यात साजरा करण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

जिल्हा वार्षिक योजनेतून १० वी आणि १२ वी मध्ये सीबीएसई व स्टेट बोर्डमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावे आणि जिल्हा संग्रहालयाला नाविन्यपूर्ण योजनेतून निधी व जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्याची विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना ग्रामपंचायतीच्या घर टॅक्स व पाणी करात १० टक्के सूट देण्यात यावी, ज्यामुळे झेडपी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढेल, असा महत्त्वाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पालकमंत्री डॉ. उईके यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केलेले हे सर्व मुद्दे गांभीर्याने घेतले असून, अधिकाऱ्यांनी या सर्व विषयांवर कालमर्यादेत कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.