संघाच्या अजरामर गीतांना महादेवन यांचा स्वरसाज!

0

 

नागपूर (Nagpur):- मातृभूमीच्या भक्तितून संघ गीतांची उत्पत्ति होते. या गीतांच्या रचनाकरांची नोंद नसली तरीही राष्ट्रभक्तीची भावना समान असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर द्वारे आयोजित या नव्‍या संगीताचा साज चढलेल्‍या या संघगीत संग्रहाचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते रविवारी सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

संघगीत संग्रह मध्ये शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलेली 10 गीते समाविष्ट आहे. काही गीतांना नव्याने चाली देण्यात आल्या आहे. या विशेष सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis),केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संगीत आणि शब्द हे भावनेचे वाहक आहेत. उत्तम शब्द थेट हृदयाला भेटतात आणि त्याला संगीताची जोड असल्यास त्याचे ग्रहण अधिक गतिशील त्याने होते. संघ गीतातील शब्दांच्या मागे जीवनाची तपस्या आहे. संघ गीतांचे कवी शोधणे कठीण आहे. जीवनाची तपस्या स्वयंसेवकांकडून हे गीत तयार करून घेते.

संघाकडे भारतातील सर्व भाषांमधील गीत असून त्यांची संख्या सुमारे 25 हजारांच्या वर आहे अशी माहिती देखील यांनी यावेळी दिली. ‘पूर्वी एकदा संघाच्या कार्यक्रमाला आल्यावर शंकर महादेवन म्हणाले होते की – हा कार्यक्रम म्हणजे एक सरगम आहे असे वाटते, आज त्यांनी आपल्या सरगमातून संघ निर्माण केल्याचे गौरव उद्गार सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची रचना ‘निर्मणो के पावन युग में हम चरित्र निर्माण न भुले’ आणि श्रीधर भास्कर वर्णेकर यांची ‘मनसा सतत स्मरणीयम’ या रचना शंकर महादेवन यांनी सादर केल्या. त्यानंतर श्री कृष्णगोपालजी यांनी ‘हम करे राष्ट्र आराधन’ या गीताची महती सांगितली आणि महादेवन आणि चमूने संघगीत संग्रहातील हे गीत उत्तमपणे गायले. साने गुरुजी यांची ‘बलसागर भारत होवो हे गीत’ महादेवन यांनी सादर करताच सभागारत ‘भारत माता की जय‘ चे स्वर निनादले.

तत्पश्चात दत्तात्रेय होसबळे यांनी ‘चरैवेति चरैवेति’हे गीत कशा प्रकारे संघस्वयंसेवकांचा कार्यमंत्र आहे हे विषद केले आणि लागलीच महादेवन यांनी ते उत्स्फूर्तपणे सादर केले. ‘संस्कृति सब की एक चिरंतन’ या गीताने सभागृहात ऊर्जा संचारीत केली. भैय्याजी जोशी लिखित ‘ध्वज केशरी शिवाचा’ चे नव्या चालीतिल गायन महादेवन यांनी केले. तत्पूर्वी यागीताविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून परमपूजनीय केशव बळिराम हेडगेवारांचे स्मरण केले. ‘एकता स्वंतत्रता समानता’ आणि ‘सूरसंगम तालसंगम’ हे संचलन आणि एकतेची अनुभूति देणारे गीत त्यानंतर गायले. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख स्वंत रंजन जी यांनी आपल्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर संघगीत ‘विश्व में गुंजे हमारी भारती’चे सादरीकरण झाले.

सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पअर्पणण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या अद्वितीय सोहळ्यात रसिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध अभिनेते शरद केळकर यांनी केले तर माजी महापौर अनिल सोले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, राजेश बागडी, दीपक खिरवडकर यांनी मेहनत घेतली.

संघाचे प्रत्येक गीत प्रेरणादायी: देवेंद्र फडणवीस
संघाचे प्रत्येक गीत हे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे अत्यंत प्रेरणादायी गीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘स्वार्थ साध्य करताना वसुधेचे कल्याण विसरू नये’ हा अजरामर विचार संघ गीतातून प्रसारित होत असल्याचे सांगतानाच हे गीत कायम कालातीत राहतील असे ते म्हणाले. यावेळी अनेक गीतांचा उल्लेख करून त्यांनी संघ गीतातून राष्ट्रभक्ती, सांघिक भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण संघगीत संग्रह गाण्यासाठी निमंत्रण : नितीन गडकरी
आगामी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संपूर्ण संघगीत संग्रहातिल 25 गाणी गाण्यासाठी शंकर महादेवन यांना तसेच सूत्र संचालन करण्यासाठी निमंत्रण देत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी प्रेरणादायी संघ गीतांच्या आठवणीना उजाळा दिला. ‘शत नमन माधव चरण’ हे संघ बौद्धिक ऐकलेले गीत कायम स्मरणात राहिले असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. शब्दसुरांच्या ताकदीने संघ भाव या गीतांनी थेट मनापर्यंत पोहोचतो आणि त्याचा आपल्या व्यक्तित्वावर सकारात्मक परिणाम होतो असे गडकरी यावे म्हणाले.

सार्थ सत्कार : सूत्र संचालक सुप्रसिद्ध अभिनेते शरद केळकर, अजरामर संघ गीत स्वरबद्ध करणारे शंकर महादेवन, संगीतकार सौमिल शृंगारपुरे, संघ गीतांचा संग्रह करणारे कुणाल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुनील आंबेकर, कुणाल जोशी, अविनाश घुशे यांचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आला.