संत चोखामेळा यांच्‍या अभंगांनी श्रोते मंत्रमुग्‍ध

0

नागपूर (NAGPUR), 26 मार्च
सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित संत चोखामेळा यांच्या जीवनावर अभंगापरी कीर्तनाचा कार्यक्रम उत्‍साहात पार पडला. रविवारी बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे संत चोखामेळा यांच्या जीवनावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभाग नागपूरचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ कलावंत मनोहर व अशोक खेकारे यांच्या उपस्थिती होती. संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. अंधश्रद्धा यावर जोरदार प्रहार करून आपल्या अभंगाच्या माध्यमातून जनतेला जागृत केले. तसेच आपल्या अभंगातून व वाणीतून सामाजिक मूल्य , बंधुभाव, नीतिमत्ता जपण्याचा सुद्धा संदेश दिला. अश्या महनीय संताचे विचारांची आजच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यांचे विचार प्रेरणादायी व ऊर्जा देणारे आहे, असे संदीप शेंडे म्‍हणाले.

ईश्वर चिंचोलकर व चमूने चोखामेळा यांच्या जीवनावर उत्कृष्ट गायनातून व अभंग वाणीतून कीर्तन सादर केले. तेव्हा रसिकांनी मंत्रमुग्ध होऊन प्रतिसाद दिला. एकंदरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.