
शस्त्रक्रियेपूर्वी गरजू रुग्णाला दिले रक्त
सरकारी किंवा खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी असल्यामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र अशा वेळेस ‘नाते रक्ताचे’ सारख्या समाजसेवी ग्रुपच्या मदतीने अनेक रुग्णांचे प्राण वाचवले जात आहेत.
अशाच एका प्रसंगी, शासकीय सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये दाखल असलेल्या हमीदा दीदी पठाण यांना शस्त्रक्रियेपूर्वी दोन युनिट रक्ताची तातडीने गरज होती. ही माहिती ‘नाते रक्ताचे’ ग्रुपवर येताच, शंखनाद न्यूज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी श्री. जितेंद्र मशारकर यांनी आपल्या दिवंगत पुत्र स्व. कुशल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून मोलाची मदत केली. विशेष म्हणजे, हे त्यांचे सलग ७४ वे रक्तदान होते.
तसेच, हकीम भाऊ हुसेन यांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्या एका रक्तदात्यानेही रक्तदान करून रुग्णासाठी मदतीचा हात पुढे केला. या वेळी हकीम भाऊ हुसेन, किसन नागरकर, प्रतीक डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सामान्य रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक डॉ. राकेश शेंडे व रक्त संक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. गुणिका पोटदुखे यांच्या हस्ते श्री. जितेंद्र मशारकर यांचा सन्मान शिल्ड व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.