
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘जागर शारदेचा… रंग मेहंदीचा’ या उपक्रमाला नागपुरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मेहंदीच्या रंगांनी बहरलेल्या या उत्सवात मेहंदी कलावंत व महिला उत्साहाने सहभागी होत आहेत.
संपूर्ण नागपुरात दि. १२ ऑक्टोबरपर्यंत अर्थात सात दिवस मेहंदी कलावंतांच्या कलाविष्कारातून आदिशक्तीचा हा जागर अनुभवता येणार आहे. यंदा शहरातील विविध भागांमध्ये ४५० ठिकाणांवर मेहंदी कलावंत सहभागी झाले आहेत. प्रत्येक मंडळामध्ये सर्व वयोगटातील महिला उत्साहाने सहभागी होत आहेत. लहान मुली देखील मेहंदी रंगवून घेत आहेत. उत्तर मंडळामध्ये महिलांनी करवाचौथच्या निमित्ताने मेहंदी रंगविण्याचा उपक्रम आयोजित केला. यामध्ये फॅन्सी ड्रेस, नृत्य, नाट्य आदी स्पर्धांचे आयोजन देखील महिलांनी केले.
गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट सुनीता धोटे यांच्या टीममधील मेहंदी कलावंत विविध शारदोत्सव मंडळांमध्ये महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक मंडळात मेहंदी रंगविण्यासाठी सहभागी होणाऱ्या महिला पारंपकिक वेशभुषेत येत आहेत. नवरात्रोत्सव संपल्यानंतरही या उपक्रमात महिला तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होत आहेत.
उपक्रमाच्या संयोजक व खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या सदस्य मनिषा काशीकर यांच्यासह भाजपच्या नागपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष दिव्या धुर्डे, महामंत्री वंदना शर्मा, मनीषा अतकरे, डॉ. विशाखा जोशी, अनिता काशिकर, संपर्क मंत्री मोहिनी रामटेके व सहसंपर्क मंत्री स्वाती आखतकर सर्व मंडळांना भेटी देऊन महिलांचा उत्साह वाढवत आहेत.
ना. श्री. गडकरी यांची संकल्पना
कला, साहित्य, संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने ना. श्री. गडकरी यांनी ही संकल्पना मांडली. त्यानुसार दरवर्षी नित्यनेमाने हे आयोजन करण्यात येते. शेकडो मेहेंदी कलावंतांना या निमित्ताने आपली कला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. याशिवाय अनेक तरुणी व महिलांनी यातूनच रोजगाराचा मार्गही निवडला.