राज्यभरातील रेशन दुकानदारांचा १ जानेवारीपासून बेमुदत संप

0

ration shopkeepers Indefinite strike 1 January

मुंबई, ३१ डिसेंबर  : राज्यभरातील शिधावाटप (रेशन) दुकानदार आपल्या विविध मागण्यांसाठी उद्या १ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशन दुकानं बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने १ जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.