Internet Usage In India : भारतात किती टक्के लोक internet चा वापर करतात?

0
ai generated, business, office

गेल्या वर्षभरात 7.3 कोटी नवे इंटरनेट ग्राहक

नवी दिल्ली (New Delhi), 20 ऑगस्ट  : भारतात गेल्या वर्षभरात 7.3 कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर पडली आहे. देशात मार्च 2023 मध्ये 88.1 कोटी इंटरनेट ग्राहक होते. तर मार्च 2024 मध्ये ही संख्या 95.4 कोटी झाली. गेल्या एक वर्षात तब्बल 8.30 टक्के इंटरनेट ग्राहक वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (Telecom Regulatory Authority of India) (ट्राय ) वार्षिक अहवालात ही माहिती पुढे आलीय.

या अहवालात विविध सेवांमधील लक्षणीय वाढीचा कल आणि प्रमुख मापदंड अधोरेखित करण्यात आले आहेत.भारतात दूरध्वनी जोडण्यांचे एकूण प्रमाण मार्च 2023 च्या अखेरीस 84.51 टक्के होते ते मार्च 2024 अखेरपर्यंत 1.39 टक्क्यांच्या वार्षिक दराने 85.69 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे या अहवालात दिसून आले आहे. यासोबतच ब्रॉडबँड सेवांनी त्यांचा चढता कल कायम राखला आहे , ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च 2023 मधील 84.6 कोटींवरून मार्च 2024 मध्ये 92.4 कोटीपर्यंत वाढली असून हा मजबूत वाढीचा दर 9.15 टक्के आहे.

देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च 2023 अखेर 117.2 कोटी होती ती मार्च 2024 अखेरीस 119.9 कोटीपर्यंत वाढली, हा वार्षिक वाढीचा दर 2.30 टक्के इतका आहे. दरमहा प्रति ग्राहक सरासरी मिनिटे वापर हा 2022-23 या वर्षातील 919 वरून 2023-24 मध्ये 963 पर्यंत वाढला आणि हा वाढीचा दर 4.73 टक्के आहे. यासोबतच समायोजित सकल महसूल देखील 2022-23 मधील 2,49,908 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 2,70,504 कोटी रुपयांपर्यंत वाढला असून हा वाढीचा दर 8.24 टक्के आहे.