

देशात अँटी-पेपर लीक कायदा लागू
मध्यरात्री अधिसूचना जारी
– पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने शुक्रवारी (२१ जून) मध्यरात्री त्याची अधिसूचना जारी केली. नोकरभरती परीक्षेतील फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेपर लीक केल्यास किंवा उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास किमान ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ₹10 लाखांपर्यंत दंडासह हे पाच वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते. परीक्षा आयोजित करण्यासाठी नियुक्त केलेला सेवा पुरवठादार दोषी आढळल्यास त्याला एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सेवा पुरवठादार जर बेकायदेशीर कामात गुंतला असेल तर त्याच्याकडून परीक्षेचा खर्च वसूल केला जाईल.
—————
मराठा- धनगर यांच्यात वाद पेटला
मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा
– छगन भुजबळ यांनीच मराठा धनगर यांच्यातील वाद पेटवला. त्यांना आता सुट्टी नाही. त्यांचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मनोज जरांगे यांची उंची काय?
बबनराव तायवाडे यांचा इशारा
– मनोज जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?, मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात. आगामी निवडणुकीत कोण कोणाला पाडते, ते आम्ही दाखवून देऊ, असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
————
पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार का
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
– भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवारांनी महत्वाचे विधान केले. वरिष्ठांच्या निर्णयानंतर नाव सांगितले जाईल, असे ते म्हणाले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेचे विश्लेषण करून ज्या उणिवा व ज्या पद्धतीने खोटा प्रचार झाला, या संदर्भात चर्चा झाली. तसेच विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जिथे कमी पडलो तिथे जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली सर्व माहिती
– विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल मुंबईतील सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच पुन्हा एक कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिथे कमी पडलो तिथे जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार, असंही ते म्हणाले.
जादूटोणा केल्याच्या संशयातून वृद्धाची हत्या
चंद्रपूर पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या
– तीन महिन्यांपूर्वी तिहेरी हत्याकांडाने हादरलेले नागभिड तालुक्यातील मौशी गाव पुन्हा जादूटोणा केल्याच्या संशयातून एका वृद्धाची हत्या करण्यात आल्याने हादरले आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी (दि.२१) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली चंद्रपूर पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
चांदीच्या दरात अडीच हजाराने वाढ
सोने 800 रुपयांनी वधारले
– सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. या आठवड्याच्या शेवटी इतक्या दिवसाची दरवाढीची कसर भरुन काढली. मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली. सोन्याने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. जळगावच्या सराफ बाजारात तीन दिवसांत चांदीच्या दरात अडीच हजाराने वाढ तर, सोने 800 रुपयांनी वधारले. चांदीचा भाव 91,500 रुपयांवर तर सोन्याचे दर पुन्हा 73 हजारांवर पोहोचले… आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे.
मुंबईच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
मोरबे डॅम साईबंधारा येथील घटना
– मुंबईतून पर्यटनासाठी आलेल्या ३७ तरुणांच्या गटातील चौघांचा खालापूर तालुक्यातील पोखरवाडी जवळच्या मोरबे डॅम साईबंधारा येथे बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. इशांत यादव (वय १९), आकाश धर्मदास माने (वय २६), रणथ महादू बंदा (वय १८) आणि एकलव्य सिंग (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी काही जण रिझवी काॅलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे समजते.
शारीरिक चाचणी आता 13 जुलै रोजी
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती
– गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती सुरू असून आज २२ जून रोजी होणारी शारीरिक चाचणी रद्द करण्यात आलेली आहे.काल रात्री झालेल्या रिमझिम पावसामुळे क्रीडांगण खराब झाले असून ही आजची शारीरिक चाचणी रद्द करून 13 जुलैला ठेवण्यात आली आहे. 24 जूनला होणारी शारीरिक चाचणी फेरबदल नसून त्याच तारखेला राहणार असे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.