
प्राचीन प्रणालीची आधुनिक ज्ञानाबरोबर सांगड घाला – डॉ. अतुल वैद्य
आकाशातील सप्तर्षी जमीनीवर अवतरले – डॉ. वेदप्रकाश मिश्रा
नागपूर, 5 ऑक्टोबर : हिंदू रिसर्च फाऊंडेशन, मुंबई-नागपूर संस्थेच्या वतीने साहित्य, कला व विज्ञान क्षेत्रातील सात मान्यवरांना सप्तर्षी पुरस्कार वितरण सोहळा रविवारी कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टम्स, आयटी पार्क येथे आयोजित करण्यात आला. भगव्या रंगाने सुशोभित झालेल्या या भरगच्चा सभागृहाने आकाशात अढळस्थानी असलेल्या सप्तर्षींचा टाळ्यांच्या गजरात गौरव केला.
या कार्यक्रमाला लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (लिटू) व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती तर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धाचे उप-कुलगुरू मा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर सप्तर्षी पुरस्काराचे मानकरी पद्म विभूषण प्रोफेसर एम. एम. शर्मा, पद्म श्री डॉ. रवी ग्रोव्हर, पद्म श्री प्रहलाद रामाराव, पद्म श्री रमेशजी पतंगे, प्रो. डॉ. जी. माधवी लथा, प्रो. इंद्रनील बिस्वास, डॉ. अनिल गोल्हर, यांच्यासह हिंदू रिसर्च फाउंडेशनचे संयोजक डॉ. टी. एस. भाल, गगन महोत्रा, श्री राज शेखरन, श्री भगवान राऊत, श्री बिपीन पटेल, कु. वृषाली जोशी, आदींची उपस्थिती होती.
यापूर्वी सप्तर्षी पुरस्काराने सन्मानित के. कस्तुरीरंगन, जयंत नारळीकर, एस. एल. भैरप्पा यांच्यासह हरिकिशन त्रिपाठी व त्यांच्या पत्नी ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर विश्व मंगल प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्राचीन प्रणालीची आधुनिक ज्ञानाबरोबर सांगड घाला – डॉ. अतुल वैद्य
प्राचीन ज्ञानाला वर्तमानकाळात आणण्याचा आणि त्या काळातील सप्तर्षींना आधुनिक सप्तर्षींशी जोडण्याचा हा हिंदू रिसर्च फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम असल्याचे डॉ. अतुल वैद्य म्हणाले. आपल्याकडे परंपरा, ज्ञानाचे भंडार असून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण काहीच करत नाही अशी खंत व्यक्त करताना ते म्हणाले, ज्ञान आणि ज्ञानार्जन करणा-या संस्थांचा आपण आदर केला पाहिजे. आपल्याकडील ज्ञानाचे डिजिटाइजेशन करण्याची गरज असून त्या काळच्या गुरूकुल सारख्या प्रणालींची आजच्या परिस्थितीशी सांगड घालून जे उत्तम आहे, ते स्वीकारले पाहिजे.
आकाशातील सप्तर्षी धरतीवर अवतरले – डॉ. वेदप्रकाश मिश्रा
जे अनुकरणीय असतात तेच अतुलनीय असतात. तेच सप्तर्षी असतात आणि कालजयी असतात. प्राचीन काळात विविध शाखांचे ज्ञान देणारे आपले सप्तर्षी जरी आकाशात अढळ स्थानी जाऊन बसलेले असले तरी या आधुनिक सप्तर्षींच्या रूपाने ते या धरतीवर अवतरले आहेत. आकाशातील ‘तारे जमीं पर’ आले असून त्यांच्यामुळे ही ‘जमीं सरजमीं’ झालेली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यासाठी त्यांनी हिंदू रिसर्च फाउंडेशनचे अभिवादन केले.
सर्व पुरस्कार प्राप्त सप्तर्षींनी हिंदू रिसर्च फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत पुरस्काराबद्दल आभार मानले.
प्रास्ताविकातून डॉ. भाल यांनी हिंदू रिसर्च फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. सप्तर्षी पुरस्कारामागची भूमिका सांगून त्यांनी हा पुरस्कार नोबेलच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला.
सूत्रसंचालन अनिता तिळवे यांनी केले.
श्री महर्षी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक टेक्नॉलॉजी (SRIVT), गुंतूर, आंध्र प्रदेशचे संस्थापक व संचालक वेदर्षि ए. बी. एस. शास्त्री उपस्थित राहणार होते. परंतु त्यांच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आल्याने ते उपस्थित राहू शकले नाही.
……………
सप्तर्षी पुरस्काराचे मानकरी
कला व विज्ञान क्षेत्रातील सात मान्यवरांना यावर्षीचे सप्तर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आले. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यात पद्म विभूषण प्रोफेसर श्री एम. एम. शर्मा यांना नागार्जुन पुरस्कार, पद्म श्री डॉ. रवी ग्रोव्हर यांना आचार्य कणाद पुरस्कार, पद्म श्री प्रहलाद रामाराव यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार, पद्म श्री रमेशजी पतंगे यांना महर्षि वाल्मीक पुरस्कार, प्रो. डॉ. जी. माधवी लता यांना विश्वकर्मा पुरस्कार, प्रो. इंद्रनील बिस्वास यांना आर्यभट्ट पुरस्कार तर डॉ. अनिल गोल्हर यांना आचार्य सुश्रुत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
………….
‘एआय’चा बोलबाला
प्राचीन काळातील भारतीय ऋषींच्या नावे दिल्या जाणा-या सप्तर्षी पुरस्कार सोहळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘एआय’चा बोलबाला होता. कला, विज्ञान, साहित्य क्षेत्रात कार्य करणा-या सप्तर्षी पुरस्कार प्राप्त मान्यवरांना नागार्जुन, आचार्य कणाद, आचार्य भारद्वाज, महर्षि वाल्मीक, विश्वकर्मा, आर्यभट्ट आणि आचार्य सुश्रुत यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. हे सर्व भारतीय जीपीटीचा वापर करून तयार करण्यात आले होते.