
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सोमवारी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार असून दुपारी ३ नंतर आयोजित होणाऱ्या सुनावणीचा अंतिम निकाल काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. (Hearing on Petition on Disqualification of MLAs) अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्यावर आता या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यापूर्वीची सुनावणी १४ सप्टेंबर रोजी झाली होती. आता आजच्या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या १४ तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठविण्यात आली असून दुपारी ३ पासून विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडणार आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या याचिका मिळाल्या नसल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे अध्यक्षांनी त्यांना या याचिकांचा अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन १७ दिवसांनी सुनावणीची तारीख निश्चित केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना खडसावल्यावर नार्वेकर यांनी तातडीची सुनावणी हाती घेतली आहे. आजच्या सुनावणीत दोन्ही गटांचे आमदार आपल्या वकिलांसह उपस्थित राहणार आहेत. अपात्रतेपूर्वी पक्ष कुणाचा यावरच भर राहण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून जून २०२२ ला अस्तित्वात असलेला पक्ष आणि प्रतोद हा मुद्दाच लावून धरण्यात आला आहे. तर शिंदे गटाकडून बहुमत असलेला पक्ष असा युक्तिवात सुरु आहे.