
नागपूर (Nagpur):- अश्विन शु. २ (द्वितीया) मंगळवार रोजी नागपूर महाल कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि नारा (कारंजा घाटगे) येथील श्री संत सखुमाता यांची सदिच्छा भेट झाली.
भेटीच्या प्रारंभी सद्भाव विभागाकडून अतुल घनोटे व देवस्थानाकडून सौ. मनिषाताई कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. या प्रसंगी दोन उर्जा केंद्रे एकत्र आल्यानंतर उच्च विचारांचे आदानप्रदान झाल्याचे उपस्थितांना अनुभवायला मिळाले. एक राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्व, तर दुसरे आध्यात्मिक व राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असे व्यक्तिमत्व अशी ही भेट ठरली.
या वेळी श्री संत सखुमाता यांनी देवस्थान परिसराचा लोककल्याणासाठी उपयोग व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच या परिसराचे लोकार्पण डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते व्हावे, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. वर्षभर देवस्थानात होणारे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम, लोकोत्सव यांची माहितीही कार्यकर्त्यांनी यावेळी सादर केली.
३० वर्षांनंतर प्रथमच नवरात्री दरम्यान श्री संत सखुमाता देवस्थानातून बाहेर आल्या आणि डॉ. भागवत यांनीही वेळ काढून ही सदिच्छा भेट घेतली. समाजात समरसता, एकरूपता व राष्ट्रप्रेरित कार्य घडविण्यासाठी अशा भेटी महत्त्वपूर्ण ठरतात, असा सूर या प्रसंगी उमटला. भेटीदरम्यान सद्भाव विभागाचे कार्य व विविध भागांतील उपक्रमांची माहिती महानगर सद्भाव कार्यप्रमुख ललित शेंडे यांनी दिली.
या ऐतिहासिक भेटीदरम्यान ज्येष्ठ प्रचारक श्रीकांत देशपांडे (सद्भाव विदर्भ प्रांत पालक), प्रशांत इंदुरकर, विभागातील सदस्य व सद्भाव कार्यकर्ते उपस्थित होते.