श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास

0

 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे लोकार्पण

 

भीमाशंकर, (Bhimashankar)दि. ९ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भीमाशंकर येथे महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी (ता. ८) पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्याची ग्वाही वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Mr. Sudhir Mungantiwar)यांनी दिली होती. देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १४० कोटी रुपयांचा आराखडा सादर झाला होता. त्यानुसार विकास कामे वेगाने करण्यात आली. आता भीमाशंकर येथे वन निसर्ग पर्यटन केंद्र साकारण्यात आले असून लोकांसाठी खुले करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग आहे. त्याला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. येथे दरवर्षी साधारणत: २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची संख्या लक्षात घेत श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्यासाठी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी बैठक घेत वनविभागाला प्रस्ताव तयार करण्यासाठी निर्देश दिले. त्या कामांचे प्रस्ताव तयार करून ते केंद्र सरकारकडून मंजूर करण्यासाठी वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार महादेव वनात रुद्राक्षाच्या रोपांबरोबर पांढऱ्या फुलांची तसेच बेलाच्या सर्व प्रजातींची लागवड केली आहे. सोबतच येणारे भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी निसर्गाची विविध माहिती देणारे केंद्र असून त्यामध्ये निसर्ग प्रेमींना पश्चिम घाटातील जैवविविधता, औषधी वनस्पती तसेच वन्य प्राण्यांची माहिती केंद्रात देण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारचे माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे. महादेव वनातील इंडिया मॅप मध्ये भारतामधील बारा ज्योतिर्लिंग दर्शक नकाशा याची माहिती दर्शविण्यात आली आहे तसेच महादेव वन हे भीमाशंकरला येणारे भावीक व पर्यटकांसाठी दिनांक ८-०३-२०२४ पासुन खुले करण्यात आले आहे.

लोकार्पण सोहळ्याला पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, निवृत्त मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक किशोर येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.