महाविद्यालयात नुकतेच पाऊल ठेवलेली मुले सगळ्याच स्तरातील पालकांसाठी अवघड जागेचे दुखणे ठरू लागली आहेत. बालपणी कळसूत्री बाहुली प्रमाणे वागणारी मुले या वयात पालकांच्या नियंत्रणाच्या बाहेर जायला लागलेली असतात. काहीही मनाच्या विरुद्ध घडले की हिंसक कृत्ये करायला धजावणाऱ्या मुलांनी पालकांनाच भीतीग्रस्त करून ठेवले आहे. श्रीमंत किंवा नोकरदार घरात आईबाप दिवसभर घरात नसतील तर अश्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी असलेल्या कुणाचेही अशी मुले ऐकेनाशी झाली आहेत. चारपाच जणांच्या मर्यादित कुटुंबातील परस्परातील संवाद कधीच थांबला आहे. सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा आणि घड्याळाच्या काट्यावर जगणे नियंत्रित झाल्यामुळे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने जगायला शिकल्याने कुटुंबाचे सामूहिकपण संपल्यात जमा झाले आहे. मुलांना ” स्पेस ” मिळावी म्हणून स्वतंत्र खोली मिळाली असली तरी त्यांचा एकांत वाढला आहे. त्यातून अनेक प्रश्नांनी तोंड बाहेर काढले आहे.
अलीकडे एक दिवसाआड टीनएजर मुलांच्या हिंसक कारवाया नजरेपुढे येताना दिसतात. महाविद्यालयीन प्रांगणातील हाणामाऱ्यांनी आता थेट हत्यांचे स्वरूप धारण केले आहे. मित्रांच्या थट्टा,मस्करी,गम्मत किंवा खोड्या सहन करण्याची क्षमता मुलांमध्ये राहिली नाही. परवा नागपुरात केवळ गम्मत केल्यामुळे एका मित्राने दुसऱ्याला एवढे बेदम मारले की वर्मावर घाव लागल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. हिंसक वृत्ती, एकांतपणा आणि उथळ झालेले स्वभाव मुलांमध्ये एवढे वाढले आहेत की दर दोन मुलान्मघे एक मुलगा जणू बारूदच्या ढिगाऱ्यावर बसल्याचे जाणवत आहे. शिक्षण आणि करियरच्या स्पर्धा सध्या एवढ्या जीवघेण्या झाल्या आहेत की मुलांना ते सोडून इतर कोणताही छंद जोपासता येईल याची कोणतीही शाश्वती राहिली नाही . त्यामुळे मुलांचे सामाजिकीकरण करणे महत्वाचे झाले आहे , त्यांना कुटुंबात रमवणे आवश्यक झाले आहे.
यात मुलांचा थोडाफार दोष असला तरी त्याची मोठी जबाबदारी पालकांकडे जाते. ज्या कुटुंबात बाहेरून भरपूर पैसा येतो तिथे कोणतीही समस्या पैश्याने सुटू शकते यावर एकमत असते त्यामुळे मुलांनी मागणी केली तेवढा पैसा त्यांच्या हातात दिला की प्रश्न सुटला असे समजले जाते. कदाचित काही समस्या पैश्याने सुटत सुद्धा असतील मात्र सगळ्या समस्यांचे पैसा हे उत्तर असू शकत नाही हे पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. महाविद्यालयात इतर मुली आणि शिक्षकांशी कसे वागावे यावर कुटुंबात कधी चर्चा झाली नसेल तर अशी मुले टीव्ही मालिका आणि सिनेमातून त्याची उणीव पूर्ण करायला लागतात. पडद्यावर दिसणारे प्रेम आणि ते असफल झाल्यावर कोणती पावले उचलावीत याचेही प्रशिक्षण तिथेच मिळाल्याने मुलांना तेच योग्य वाटते , याबाबत कुटुंबात कुणाशी बोलावे असे नातेच एवढ्या वर्षात निर्माण झालेले नसते हा मोठा अडथळा त्यात निर्माण होतो.
प्रेमाच्या नादात मुलींच्या क्रूरपणे झालेल्या हत्त्या प्रकरणात मोठा भाग मुलांचा असल्याचे दिसते. आवडणाऱ्या मुलीने नकार देताच याचा पुरुषी अहंकार जागा होतो आणि नको ते घडते. कोणत्याही मुलीशी कसे वागले पाहिजे यावर ज्या कुटुंबात चर्चा होतात त्यातून मुलांचे विचार विकसित व्हायला मदत होते. जी वागणूक आपल्या बहिणीशी कुणी केलेली तुला आवडणार नसेल तर तीच वागणूक इतरांना कशी आवडेल ? यावर कधीतरी कुटुंबात संवाद झाला नसेल तर वागण्याचा हा वेगळा अँगल मुलांच्या व्यक्तिमत्वात खुलणार नाही , त्यासाठी दररोज नसला तरी एक दिवसाआड मुले आणि पालकात अभ्यासाच्या व्यक्तिरिक्त संवाद व्हायला हवा. किमान आठवड्यातून एकदा तरी जेवणाच्या वेळी अश्या संवादाची सुरुवात व्हायला हवी तरच त्यातून मुलांच्या डोक्यात काय चाललेय याची कल्पना येऊन त्यावरचे उपाय शोधता येतील. हा संवाद होत नसेल तर तत्काळ सुरु करायला हरकत नाही.
टीनएजर मुलगा किंवा मुलगी यांचा जवळचा मित्र,मैत्रीण आईवडिलांनी होण्याची आजच्या काळात गरज आहे. नाहीतर ही स्पेस ते इतरत्र शोधत असतात आणि बाहेरून त्यांच्या हिताचा सल्ला मिळेल याची कोणतीही गॅरंटी आताच्या काळात देता येऊ शकणार नाही. पालकांनी सुद्धा टिपिकल आई किंवा बापाच्या भूमिकेतून काहीकाळ बाहेर येऊन मुलांच्या पातळीवर येऊन विचार करण्याची किंवा त्यांच्या भावना किमान समजून घेण्याची गरज आहे. सतत कानावर येणाऱ्या बातम्यांनी हा पालक भयग्रस्त बनला आहे त्यामुळे त्याच्या संयमाच्या कडेलोट होऊन त्याच्यातील जमदग्नी पालकाचे दर्शन कधीतरी मुलांना होतेआणि तिथूनच दुरावा वाढायला लागतो. मुलांच्या पुढे झुकणे म्हणजे आपला पराभव असल्याचा मोठा गैरसमज आधी डोक्यातून काढावा लागेल तो निघाला की मुलांच्या भावना,अडचणी समजणे अधिक सोपे व्हायला मदत होते.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248