
नागपूर(Nagpur), 14 जुलै:-संस्कृतभारती नागपूर महानगर द्वारे गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कृतभारतीच्या प्रांत कार्यालयात पांडे लेआउट येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक व संस्कृतभारती नागपूर महानगर चे अध्यक्ष विलास काळे होते. तर मुख्य वक्ता म्हणून डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल अर्ष विज्ञान गुरुकुलमच्या मुख्य आचार्य महामहोपाध्याय स्वामिनी ब्रह्मप्रकाशनंद सरस्वती यांची उपस्थिती होती.
स्वामिनी ब्रह्मप्रकाशनंद सरस्वती अत्यंत प्रभावीपणे गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्या महिमांचे वर्णन केले. विलास काळे यांनी ज्या व्यक्तीकडून काहीतरी चांगले शिकायला मिळते तो तुमचा गुरु असतो. तो वयाने तुमच्यापेक्षा लहान असला तरी चालेल, असे मत व्यक्त केले.
संस्कृत भारती नागपूर महानगरच्या स्तोत्र पठण शिक्षिका सुनीता लुले यांनी अनुगायन पद्धतीने गुर्वष्टकस्तोत्राचे सामूहिक पठण केले तर संचालन स्वाती लोढे यांनी केले. प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय केतकी डांगे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन अंजली बेंद्रे यांनी केले. कार्यक्रमात संस्कृत भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणमान्य संस्कृत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.