21 ऑगस्टला जिल्हा बंदचे आवाहन

0

गडचिरोली (Gadchiroli), 20 ऑगस्ट,- आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी २१ ऑगस्टला गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी गडचिरोली शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून, सकाळी ९ वाजतापासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आरक्षण बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी भास्कर मेश्राम व मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले की, अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व क्रिमिलेअर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याचा विरोध करुन, निकाल तत्काळ रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा पारित करावा, आरक्षणाचे अ, ब, क आणि ड असे गट पाडल्यास समाजात फूट पडून पुन्हा गुलामगिरीत ढकलले जाईल आणि सर्वांना एकत्र आणून गुलामगिरी नष्ट करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांना खीळ बसेल, असे भास्कर मेश्राम आणि मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले. बुधवारच्या बंद आणि धरणे आंदोलनात अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला तुळशीराम सहारे, कुणाल कोवे, मिलिंद बाबोंळे, मंदीप गोरडवार, नरेश महाडोरे, सुरेश कन्नमवार, सुधीर वालदे, विद्या कांबळे, रेखा कुंभारे, अरविंद वाळके, मालती पुडो यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.