
नागपूर- भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येत आहे. सेवाग्राम येथील बापुकुटीला अभिवादनाने सकाळी ९ वाजता ही यात्रा सुरु केली जाणार आहे. यानंतर हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून या यात्रेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे होणार आहे. नवरात्रीनंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे, असे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केले आहे.