‘उबुंटू’ आफ्रिकेतील एक सर्वांगसुंदर गोष्ट आहे.वस्तुतः ही आफ्रिकेची एक विशिष्ट संस्कृती म्हणजे ‘उबुंटू संस्कृती’शी आपली ओळख करून देते.एका मानववंशशास्त्रज्ञाने आफ्रिकेतील आदिवासी मुलांना एक खेळ खेळावयास सांगितला.त्याने मिठाईची एक टोपली एका झाडाजवळ ठेवली आणि मुलांना सांगितले की त्यांनी झाडापासून शंभर मीटरच्या अंतरावर उभे राहावे.
मग त्या शास्त्रज्ञाने जाहीर केले की जो ही पळत जाऊन सर्वात आधी झाडाजवळ पोहोचेल,मिठाईची टोपली त्याची होईल.या नंतर मुलांना हाक मारीत तो म्हणाला,’तयार आहात ना..! आता पळा बरं लवकर..!’ तुम्हाला ठाऊक आहे,मुलांनी काय केलं ते? त्या मुलांनी एकमेंकांचा हात पकडला आणि सोबत मिळून झाडाकडे पळत सुटले.त्यांनी मिठाई परस्परांमध्ये समान वाटून घेतली,आणि भरपूर आनंद साजरा करत ते खाऊ लागले.जेव्हा शास्त्रज्ञाने त्यांच्याकडून असे करण्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली,
तेव्हा ती मुलं म्हणाली- उबुंटू,ज्याचा अर्थ होता-‘आमच्यातला कुणी एकजणच कसा आनंद साजरा करू शकतो,जोवर बाकीची मुलं दुःखी आहेत?’ त्यांच्या बोलीभाषेत ‘उबुंटू’ चा अर्थ आहे-
‘ मी आहे,कारण आम्ही आहोत!’ हा सगळ्या पिढ्यांसाठी एक मोठा संदेश बनू शकतो.
आपल्यातल्या प्रत्येकाचे वागणे असेच असते तर आपण जिथे जाऊ तिथे आनंदाला उधाण आले असते! आपले जीवनदेखील एक ‘उबुंटू’ जीवन असते…तर आपणही म्हणू शकलो असतो…
मी आहे…कारण की आम्ही आहोत ! सध्या आपण सगळेच दिसणाऱ्या क्षणिक सुखाच्या मागे लागण्याच्या स्पर्धेत सहभागी झालो आहोत ,त्यामुळे आम्ही,आपण या सामूहिक भावनेचा,संस्काराचा विसर आपल्याला पडला आहे. जोवर बाकीचे लोक म्हणजे आपल्या सभोवताल कुणीतरी दुखी आहे तोवर मला आनंद घेण्याचा अधिकार कसा काय असू शकतो ही सामूहिक कर्तव्याची भावना उबुंटू मागे आहे ती आपल्या प्रत्येकात यायला हवी.
केवळ भारतीय संस्कृती तेवढीच चांगली आणि जगात घडत असते ते सगळे वाईट असे म्हणता येणार नाही कारण आपण जगच बघितलेले नसते आपण ज्या परिसरात असतो त्यालाच आपले जग मानून जगणे सुरु असते. माणूस जिथे वसलेला असेल त्या त्या भागात उन्नत मानवी सभ्यता नक्कीच असते. काही नाती आणि कर्तव्ये शब्दांच्या पलीकडे असतात.मानव पहिल्यांदा जेव्हा पृथ्वीवर आला त्याकाळात कदाचित तो एकटा असेल मात्र आईच्या पोटात त्याचे बंध आईशी नाळेच्या माध्यमातून जुळलेले असतात त्यामुळे मी पण गाळून पडण्याची सुरुवात तिथूनच होते. मधला काहीकाळ त्याला मी पणाची बाधा नक्कीच होते मात्र हा मी पणा मर्यादित काळाचा पाहुणा असल्याचे लक्षात आल्यावर मनुष्य सामूहिक प्रेरणा शोधायला लागतो. कुटुंबाच्या सोबत राहून जो आनंद मिळतो आणि त्यातून जी मानसिक जडणघडण होत जाते हे अदृश्य कोचिंग मनुष्याला पुढे संस्कारित करीत असते.
आनंद,सुख किंवा मजा एकट्याला ओरबाडता येऊ शकते ,अनेक लोक तसा प्रयत्न नेहमीच करीत असतात मात्र असा एकट्याने घेतलेला आनंद दीर्घकाळ टिकत नाही कारण मनाच्या अनंत अवस्था या आनंदाच्या पुनरावृत्तीचा प्रत्यय देत नाहीत. मी च्या ठिकाणी आम्ही किंवा आपण जेव्हा तयार व्हायला लागतील तेव्हा हाच आनंद कित्येक पटीने वाढत जातो. आदिमानवाच्या अवस्थेत सुद्धा मनुष्य टोळ्या करून राहायचा ,या टोळीतही सामूहिक आनंदाचा प्रत्यय यायचा. सुख,दुःख आणि साहस सुद्धा जेव्हा सामूहिक भावनेने वाटले जाते त्यावेळी दुःख कमी होते, आनंद वाढत जातो आणि साहस सहज शक्य होते. मी पणात छोटेसे कार्यही डोंगराच्या एवढे वाटायला लागते ,यालाच सोबतीला चार हात लागले तर गप्पांच्या ओघात कठीण कार्यसुद्धा सहज पार पडते हा आपल्याला आलेला अनुभव असतो. उबुंटू हा त्याचेच प्रतीक असेल तर आपणही जगण्याच्या प्रत्येक क्षणी त्याचा वापर करायला हवा.
कोणत्याही गोष्टीत एकट्याला जो आनंद मिळतो त्या तुलनेत सामूहिक कार्यात मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठे असते. जगभर ज्या चळवळी निर्माण होऊन यशस्वी झाल्या त्याचे मर्म मी पणात नव्हे तर आम्ही किंवाआपण या शब्दात दडलेले आहे.दक्षिण आफ्रिका असू दे किंवा सुदान मुले सगळीकडेच निष्पाप आणि निर्व्याज असतात. शेयरिंग त्यांना बालपणापासूनच शिकवले जाते ,जिथे शिकवले जात नाही तिथे मुले सवंगड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाचून हा संस्कार आत्मसात करीत असतात. ओरबाडणे,हिसकावून घेणे याला शरीराची ताकद लागते मात्र देणे,किंवा समर्पण,मदत यासाठी मनाच्या ताकदीची कसोटी लागत असते. ओरबाडल्याने कदाचित आसुरी आनंदाची अनुभूती होईल परंतु देण्यामुळे चिरकाल टिकणारा आनंद आणि समाधान आपल्या व्यक्तिमत्वात मोलाचे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरू शकतात. उबुंटू हे संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला उधळून देण्याचे दुसरे नाव आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248