
जयंत माईणकर
सिद्धिविनायक! देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक! सुपरस्टार अमिताभ आपली सौंदर्यवती सून ऐश्वर्यासह ज्याच्या दर्शनाला पहाटे आपल्या जुहुतील बंगल्यापासून मंदिरापर्यंत पायी यायचा. परत जाताना मात्र आपल्या आलिशान कारमधून जायचा! १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये बांधल्या गेलेल्या या मंदिराच महत्त्व मुंबईच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रसारानंतर सार्वजनिक गणेशोत्सव नावारूपास येऊ लागले. त्यातीलच एक म्हणजे १९३४ साली स्थापन झालेला लालबागचा राजा! विविध न्युज चॅनेलवर सेलिब्रिटीज भेट देणाऱ्या गणपतींची चलती सुरू झाली. त्यातच एक नाव पुढे आलं लालबागचा राजा! तेरा चौदा फूट उंच असलेल्या मूर्तींच्या समोर नतमस्तक होणाऱ्या सेलिब्रिटींजचे फोटो मीडियाची शोभा वाढवू लागले आणि कोळी, कामगारांनी एकत्र येऊन सुरू केलेला लालबागचा राजा पाहता पाहता सिद्धिविनायकाच्या तोडीस तोड सेलिब्रिटी गणपती बनला.अमिताभ, शाहरुख तर सोडाच शिल्पा शेट्टी इत्यादी सुद्धा आकर्षक पेहरावात जेव्हा तेरा फुटी लालबागच्या राजासमोर झुकू लागले आणि लालबागचा राजा सेलिब्रिटी देवता बनला. लोकमान्य टिळकांनी राजकीय, सामाजिक ऐक्यासाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वापर अनेक सेलिब्रिटी स्वत:ची पब्लिसिटी करण्याकरता वापरताना दिसतात. चापून चोपून नऊवारी नेसलेली शिल्पा शेट्टी ढोलकीच्या तालावर नाचताना दिसते. लगेच त्या क्लिप्स व्हायरल होतात.
सामान्य माणूस बिचारा तासनतास रांगेत ताटकळत उभा राहून लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस बाळगून असतो. आणि त्याचवेळी व्हीआयपी दर्शन या नावाखाली सेलिब्रिटीज, राजकारणी यांना मात्र सुलभ दर्शन मिळत राहत. एकीकडे लालबागच्या राजाचे स्वयंसेवक आणि रांगेतील भक्त यांच्यात चक्क मारामारी होते. आणि ज्या चॅनेलमुळे सेलिब्रिटीजच्या गणेश भेटीना बातमी म्हणून दाखवलं त्याच चॅनेल्सनी ही मारामारी सुद्धा लाईव्ह दाखवली. मीडियामध्ये गणेशोत्सव, लालबागचा राजा चक्क एक बीट बनलं. कारण तिथे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरू झालं.लालबागच्या राजाचा कुंकुरुपी आशीर्वाद.जनतेच्या भावना, भांडवली व्यवस्थेत योग्यरीत्या उपयोगात आणली जाते.
कुंकू लालबागच्या राजाचे नाव घेऊन भक्तांना दिले जातय.विशेष निवेदन देऊन अलर्ट देखील करतायेत की सेवन करण्यासाठी नाही, किती ती काळजी भक्तांची. हे कुंकू शेवटी सहकारी बँकेचं मार्केटिंग करतं. मला याक्षणी आठवतात ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे.आमच्या लहानपणी तर नवसाला पावणारा नव्हता .
आम्ही तर कधी नाही ऐकले , पु.ल. देशपांडे म्हणाले होते.
संतोषी माता , हे प्रकरण सत्तरच्या दशकात लोकप्रिय असताना माझे वडील स्व.प्रा. पां . शं माईणकर त्यांच्या सहकाऱ्याला म्हणाले होते त्यांच्या लहानपणी त्यांनी संतोषी माता हे नाव ऐकल नव्हतं. त्यांचे वडील -माझे आजोबा एका मंदिराचे पुजारी होते. ही उदाहरणं पहिली की वाटत एखाद्या देवाला सुद्धा सेलेब्रीटी स्टेटस यायला नशीब लागतं का? अमिताभ, ऐश्वर्या सिद्धिविनायक मंदिरात चालत गेल्यानंतर त्याचवेळी त्याला आणि त्याच्या सुनेला पाहण्यासाठी आणि मग सिद्धिविनायकाचं दर्शन करणाऱ्यांची संख्या चांगलीच मोठी होती.
व्हिआयपी दर्शन हे मला कधीही न सुटणारे कोडे आहे. त्यासाठी भरपूर रक्कम मोजणाऱ्यांची मला कीव करावीशी वाटते.
त्यातच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांच्या सत्तावीस मजली अँटीलिया निवासस्थानी गणपतीची स्थापना होऊ लागल्यानंतर ‘ अंबानीच्या ‘ गणपतीचं दर्शन घेणाऱ्यांची रीघ लागली. क्रिकेट,फिल्म्स आणि पॉलिटिक्स या तीनही क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती या गणपतीचं दर्शन घ्यायला येऊ लागल्या. एकाच वेळी अंबानींच्या गणपतीच्या द्वारी होणारा व्हीआयपी संगम मीडियाच्या दृष्टीने एक पर्वणी ! त्यामुळे मीडिया, त्यांचे मालक ही संधी कशी सोडणार? प्रभादेवी पासून सुरू झालेला सिद्धिविनायकाचा प्रवास लालबागमार्गे मलबार हिलवर पोचला. अंबानींच्या गणपतीच्या आरतीच रेकॉर्डिंग जवळपास सर्वच चॅनेलनी दाखवलं. गणपतीची आराधना केली म्हणूनच की काय मुकेश अंबानी जगातील एक श्रीमंत बनला अशी जनसामान्यांची धारणा होऊ शकते. सिद्धिविनायक आहे तिथेच राहतो. सालाबादाप्रमाणे लालबागच्या राजासमोर मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील लोक रांगेत तासनतास उभे राहून दर्शन घेतात तर व्हीआयपी दर्शन हा प्रकार खास गणमान्य व्यक्तींसाठी. अंबानींच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला मात्र आमंत्रण पाहिजे. अर्थात जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अंबानींचा गणपती सामान्य जनतेसाठी नाहीच! आर्थिक निकषावर देवातही फरक!
सेलिब्रिटी , मार्केटिंगमुळे आणि चॅनेलवरील लाईव्ह कव्हरेजमुळे या सर्वच गणपतींचं महत्त्व वाढत. मला याबाबतीत एक विषयांतर करणारी पण गमतीदार घटना लक्षात येते. १९९४ साली हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटात विवाह प्रसंगाच्या प्रत्येक घटनेचं चित्रीकरण लोकांना आपल्या घरातलं वाटू लागलं. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी लग्नाच्या आदल्या दिवशीचा संगीत समारोह, परातीतील अंगठी शोधणे किंवा जावयाचे बुट चोरणे यासारख्या घटनांना इतकं अवास्तव महत्त्व दिल्याचं माझ्या पाहण्यात नाही. पण या चित्रपटानंतर ही प्रत्येक घटना जवळपास प्रत्येक विवाहसमारंभात दिसू लागली. गाण्याचा अर्थ समजत असो अथवा नसो पण लोकप्रिय गाण्यावर नाच झालाच पाहिजे. संगीत समारोह हा प्रत्येक लग्नाच्या आधीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. मार्केटिंग काय करू शकत याच जिवंत उदाहरण! आज तोच प्रकार सार्वजनिक गणपतींच्या बाबतीत घडतोय की काय असं वाटतं. ज्या गणपतीला जास्त सेलिब्रिटी भेट देतील तो गणपती बातम्यांमध्ये राहतो, ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.
देव या मानवनिर्मित संकल्पनेबद्दल लिहिताना अथवा भाषण देताना मी एका मुद्द्याचा उल्लेख आवर्जून करतो. सिंधू संस्कृतीचे अवशेष
बघितले तर त्यात एकही सार्वजनिक प्रार्थना स्थळ आढळणार नाही. आपल्या श्रद्धा, धार्मिक भावना आपल्या घरात, उंबरठयाच्या आत ठेवणं हेच सयुक्तिक! आणि हे विधान सर्वच धर्मियांसाठी लागू आहे.अर्थात हे मान्य केलं तरच ट्रॅफिक जॅम, पर्यावरण यासारखे मूलभूत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी असते. देव, जर असलाच तर तो सर्वव्यापी असणार. कारण हेच सर्व धर्मात सांगण्यात आलं आहे. मग त्याच्या दर्शना करता तासनतास रांगेत उभं राहणं अयोग्य हे माझं मत! त्याचबरोबर आपल्या भक्तीच लाईव्ह प्रदर्शन करणही अयोग्य! तूर्तास इतकेच!