

माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांचाही भाजपा प्रवेश
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले स्वागत
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे (Anil Gawande, State President of Prahar Jan Shakti Party) यांनी शनिवारी आपल्या सहकाऱ्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री.गावंडे यांचे स्वागत करत त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.विक्रांत पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. श्री.गावंडे यांच्या प्रवेशामुळे अकोल्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातील माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी व कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सई डहाके यांनीही राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
श्री. बावनकुळे म्हणाले की, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष श्री. गावंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना,विकासकार्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री.गावंडे प्रयत्न करतील.आ.कुटे यांच्या पुढाकाराने श्री.गावंडे यांच्यासारख्या समर्थ नेतृत्वाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात श्री. गावंडे यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहून त्यांचा यथोचित सन्मान राखेल अशी ग्वाही श्री. बावनकुळे यांनी दिली.
श्री.गावंडे म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शेतक-यांच्या आणि स्थानिक समस्या सोडवण्याचा शब्द दिला,त्यांच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवून शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपा मध्ये प्रवेश करत आहोत.पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असेही ते म्हणाले.
वसंतराव देशमुख यांनी जयश्रीताई थोरात यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपा निषेध करत असून अशा प्रकारचे वक्तव्य कदापि खपवून घेणार नाही असे श्री.बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.पक्षातर्फे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. देशमुख यांच्यावर पोलीसांनी,महिला आयोगाने कडक कारवाई करावी अशी मागणीही श्री. बावनकुळे यांनी केली. देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा गैरफायदा घेऊन कुणीही सुजय विखे पाटील यांची नाहक बदनामी करू नये. सुजय यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या विरोधी पक्षांच्या हल्लेखोरांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी, असेही श्री.बावनकुळे यांनी सांगितले.