
युवा कलाकारांच्या प्रस्तुतीला रसिकांची भरभरून दाद
नागपूर(Nagpur), 13 जुलै:-‘उपज’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘मीरा और कबीरः भक्ती से मुक्ती तक’ या संगीतमय कार्यक्रमाची भव्य आणि भक्तिमय प्रस्तुती शनिवारी शंकरनगर येथील साई सभागृहात पार पडली. जीवनातील सत्य, प्रेम आणि भक्तीचा संगम असलेल्या संत कबिरांचे भावगर्भ दोहे आणि कृष्णभक्तीत लीन झालेल्या संत मीराबाईंच्या रचनांना रसिकांच्या समोर घेऊन येण्याच्या युवा कलाकारांच्या धाडसाला मोठ्या संख्येने उपस्थित जाणकार रसिकांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाची संकल्पना आदित्य सावरकर आणि आर्य पुराणकर यांची होती, तर संगीत संयोजन आर्य पुराणकर व ध्वनी संयोजनाची जबाबदारी ऋषभ ढोमणे यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाचे उद्घाटन अजय खोलपूरकर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, श्री सिद्धीविनायक ट्रस्टचे प्रख्यात कलावंत प्रफुल्ल माटेगावकर, छायाचित्रकार गजानन रानडे, आणि संगीतकार शैलेश दाणी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यश खेर, निधी रानडे, आदित्य सावरकर आणि साक्षी सरोदे यांनी आपल्या सशक्त गायनाने रसिकांना भक्तिरसात रंगवले. यश खेर यांनी ‘मन लागो यार’, ‘हलके गाडी हाको’ आणि ‘झीनी रे झीनी’ या पारंपरिक रचना सादर केल्या, तर निधी रानडे यांनी ‘सुमीरन बीन’, ‘करम की गति न्यारी’ आणि ‘चाकर राखो जी’ या भावस्पर्शी रचनांद्वारे वातावरण मंत्रमुग्ध केले. साक्षी सरोदे यांनी ‘गढ़ से जो मीराबाई’ आणि ‘लागी लगन’ या गीतांतून मीरेच्या भक्तिभावाची अनुभूती दिली. आदित्य सावरकर यांनी ‘शून्य गढ़ शहर’ हे निगुर्णी भजन, ‘पिंजरा’, ‘भला हुआ मोरी’ यांसारख्या रचनांतील कबिराचे वैचारिक गहिरेपण आपल्या साजेश्या आवाजातून सादरीकरण केले. ‘म्हारो प्रणाम’ आणि ‘मल्हार जाम’ ही द्वंद्वगीते कलाकारांनी खास शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली. यांच्या स्वरांनी रसिकांना खिळऊन ठेवले. आणि रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शबरी पुराणिक आणि अवनी काशीकर यांच्या मनमोहक नृत्याभिनयाने कार्यक्रमाची उंची वाढवली तर प्रमोद बावणे, अरविंद उपाध्याय, अथर्व शेष, गौरव टांकसाळे, प्रवीण लिहितकर, निशिकांत देशमुख, विक्रम जोशी आणि महेंद्र वातुळकर या कुशल वादकांनी संपूर्ण कार्यक्रमभर उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचे अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन आर्या घटवाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आरजे तेजल यांनी केले.
कार्यक्रमाला एमजी मोटर्सच्या पंखुडी व नीता नांगिया, जीआयएम वेल्थचे समीर व सुप्रिया देशपांडे, स्पेसवुडचे विवेक देशपांडे, वालोकर ज्वेलर्सचे अनिल व भारती वालोकर, गोदरेज इंटेरिओचे सुमंत आमदेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.