

शैक्षणिक व व्यावसायिक संधी वृद्धींगत होणार
नागपूर (NAGPUR), 13 मे
यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई) आणि आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी एचसीएलटेक यांच्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार करण्यात आला आहे. एचसीएलटेकचे सेंटर हेड डॉ. शैलेश आवळे व वायसीसीईचे प्राचार्य डॉ. यु. पी. वाघे यांनी करारावर स्वाक्षरी केली.
हा सामंजस्य करार तीन वर्ष कालावधीसाठी राहणार असून यात वायसीसीईच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, कार्यशाळांच्या आयोजनासोबतच लाईव्ह प्रोजेक्टचा अनुभव घेता येणार आहे. प्राध्यापक विकास, अभ्यासक्रम सुधार आणि संयुक्त संशोधन उपक्रमांनादेखील या कराराद्वारे वाव मिळणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक प्रशिक्षण सध्याच्या उद्योग गरजांशी सुसंगत ठरणार आहे.
वायसीसीईमध्ये एचसीएलटेक तांत्रिक सत्रे घेणार असून पर्यायी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. उच्च शिक्षणासाठी व्यावसायिकांना नियुक्त करून आणि विद्यार्थ्यांसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानावर हॅकेथॉन आणि तांत्रिक कार्यशाळांचेदेखील आयोजन केले जाणार आहे.
विदर्भातील शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी ही भागीदारी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे डॉ. यु. पी. वाघे यांनी म्हटले आहे.