मधुसूदन (मदन) पुराणिक
ह्या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा मानवासहीत प्रत्येक प्राणीमात्राला अनेक अंगासह एक अतिरिक्त भेट म्हणून एक शेपटीही दिली. अर्थात ह्या शेपटीचा उपयोगही प्रत्येक प्राणी योग्य तो करतच असतो. मानवाच्या शेपटीचा तसा विशेष उपयोग त्याने करून घेतला नसावा म्हणून हळुहळू शेपटी कमी होत जाऊन माणूस हा बिनशेपटीचा प्राणी म्हणून आपण बघतो आहोत.
तसं बघीतल्यास मानव आणि वानर ह्यांचं शरीर आणि स्वभाव साध्यर्म बघता मानववंशाची सुरुवातच वानरप्राण्यापासून झाली असली तरीही कालांतराने मानवाची शेपटी लुप्त झाल्यावरही शेपटीची वळवळ ही अजूनही कमी झाल्याचे दिसत नाही. परंतु वानरवंशी असूनही त्याच्या शेपटीचा गुणधर्म हा श्वानाच्या शेपटीशी कसा काय जुळतो हा मला पडलेला आणि कायम अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
बरं मानव ह्या प्रजातीचा केवळ कुत्र्याच्या शेपटाशीच नव्हे तर जिभेशीही जवळचा संबंध आहेच ह्याची खात्री आजकाल प्रत्येक पाऊलावर येतो आहे. मालकाला आपण त्याचे किती निष्ठावान आहोत हे दाखविण्यासाठी त्याच्यासमोर लाळघोटेपणा करीत आणि नको तेवढी शेपटी हालवित राहण्याची सवय काही ऊद्दाम माणसांना लागलेली आहे. विशेष म्हणजे आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले विचार आणि आपल्याला मिळालेली शिकवण, स्वाभिमान ह्यांना तिलांजली देत केवळ स्वार्थवृत्ती सांभाळत ज्या विचारांशी आपल्या पूर्वजांचे कधीच जमले नाही त्यांच्या पायाजवळ शेपटीची वळणे घेत आणि जिभेची लाळ घोटत पडून राहाणे ह्या गुलामगिरीला इमान आणि श्रद्धा असणे कसं काय म्हणू शकतो. त्यातल्या त्यात ज्यांच्यावर आतापर्यंत केवळ भुंकल्याप्रमाणे शब्दफेक करीत राहीले त्यांच्याच मांडीवर बसण्याचे आणि त्यांच्या हातांनी स्वत:ला थापटून घेत खोटे खोटे प्रेम कसे काय अनुभवू शकतो. आशांकडून नक्कीच स्वाभिमानी आणि आपल्या विचारांशी इमानी असल्याच्या पावतीची अपेक्षा कशी काय करायची?
विशेषत: वाचाळ आणि उद्दामपणा हा गुण नक्की कुणाचा हे कुणालाही सांगायची गरज पडणार नाही इतके वैशिष्ट्यपूर्ण प्रत्यक्ष दर्शन सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्रपावेतो विनासायास, एखाद्या गोष्टीचा वीट यावा एवढे घडत असते.
काहीही म्हणा परंतु आपल्या पूर्वजांचे गुणधर्म सोडून सरळमार्गी लोकांवर भुंकण्याची आणि चावा घेण्याची सवय असणाऱ्या अशा श्वानांच्या शेपट्याही कधीही सरळ होणाऱ्या नाहीत, कुठल्याही नळकांड्यात टाकल्या तरी, या शेपट्या ओरीजीनल नसल्या तरीही. अर्थात त्यांच्या शेपट्या किती दिवस अशा त्या हलणार आहेत, जिव्हा गळत राहणार आहेत आणि केवळ भुंकणे सुरु असणार आहे, हे येणारा काळच ठरवेल.