
‘हार्ट ऑफ इंडिया’ मध्ये 1440 किमी अंतर केले पूर्ण
सीएसी-ऑलराऊंडर्सचे आंतररराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजन
(Nagpur)सीएसी-ऑलराऊंडर्स, नागपूरच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑल वुमन बाइकिंग टूरमध्ये नागपूरच्या 6 महिला बाईकर्स 1440 किमी अंतर पूर्ण करीत “क्वीन्स ऑन द व्हील” ठरल्या.
2 मार्च रोजी सुरू झालेल्या या मोहिमेत या महिलांनी ‘हार्ट ऑफ इंडिया’ म्हणजेच मध्य प्रदेशात प्रवास करीत तेथील समृद्ध वारसा स्थळांना भेटी दिल्या. तेथील विविधरंगी संस्कृतीचा अभ्यास केला आणि घनदाट जंगलामध्ये प्रवास करत साहस आणि धैर्याचे उदाहरण प्रस्तुत केले.
मध्य प्रदेश टुरिझमच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या “क्वीन्स ऑन द व्हील” या ट्रेलमध्ये
नागपुरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एमबीए कॉलेजच्या प्रो. शिल्पा पुरी, फोटोग्राफर अॅलेस्साँड्रा निर्वाण, पॅरॅमेडिकल टेक्निशियन रुचिका मेघे, आयआयएमची विद्यार्थीनी आग्या जैन, निसर्गोपचार तज्ज्ञ मैथिली सिंग व स्पोर्ट्स ट्रेनर कांचनी यादव या बाईकर्स सहभागी झाल्या होत्या. याशिवाय, हैदराबाद, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, देवास येथील 19 महिलांची या मोहिमेत सहभाग नोंदवला.
या महिला बाईकर्सनी सांची, चंदेरी, कुनो, ग्वाल्हेर, ओरछा, खजुराहो आणि भोपाळ असा 1440 किलामीटरचा प्रवास अवघ्या 8 दिवसांत पूर्ण केला. उद्या, 8 मार्च 2024 रोजी या मोहिमेचा भोपाळ येथे समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासोबतच मध्य प्रदेशला महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सशक्त स्थान म्हणून प्रदर्शित करणे, हा या ट्रेलचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती सीएसी-ऑलराऊंडर्स संचालक अमोल खंते यांनी दिली. या मोहिमेच्या सफलतेसाठी संयोजक सीएसी-ऑलराऊंडर्सच्या एकता खंते, स्वप्नील कपूर, अमोल वडीखाये, राहुल आनंद व अजय गायकवाड यांचे सहकार्य लाभले.