
मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) वाढवली आहे. दोन हजाराच्या नोटा उद्यापासून व्यवहारात वापरता येणार नाहीत. मात्र, नोटा बँकेत जमा करण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने वाढविली आणखी सात दिवसांनी वाढविली आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने शनिवारी परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.
मे महिन्यात या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला होता. नोटा जमा करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्या बदलून घेण्यासाठी आणखी सात दिवसांचा अवधी मिळाला आहे. 2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट आली होती. त्यानंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय १९ मे २०२३ रोजी घेण्यात आला होता. रद्द केलेल्या दोन हजार रुपयांच्या चलनातील एकूण नोटांपैकी आतापर्यंत सुमारे ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या असल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच जाहीर केले आहे.