

डोंबिवली(Dombivli) ०७ जुन:- कोपर ते दिवा रेल्वेस्थानक दरम्यान लोकलमधून रुळावर पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडली आहॆ. डोंबिवली शहरातील केयूर सावळा (वय 37) नावाचा तरुण असून पुन्हा एकदा लोकलच्या गर्दीचा बळी ठरला आहे. यापूर्वीही असा अनेक घटना झाल्या असून रेल्वे प्रशासनाने यावर काहीतरी तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे.
मागील महिन्यात लागोपाठ लोकलमधून पडून महिला, पुरुष, तरुण आदींचे जीव गेले आहेत. घटना झाली की तात्पुरती याविषयी वर्तमानपत्रांतून मथळ्यावर मथळे छापून येतात मात्र त्यानंतर पुन्हा काहीच वाच्यता होत नाही. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने केव्हा पाहणार असे बोलले जात आहे.
गुरुवारी नेहमीप्रमाणे दोन प्रवाशी मित्रांनी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी डोंबिवली स्थानकातून फास्ट लोकल मध्ये नेहमी प्रमाणे गर्दीचा सामना करीत लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने त्यातील एक मित्र बबन शिलकर कसाबसा रेटारेटी कसरत करत लोकलच्या डब्यात घुसले. मात्र घटनेतील मयत केयूर सावळा हे बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकले होते. गर्दीमुळे केयूरला लोकल मध्ये प्रवेश करता आला नाही. बबन शिलकर यांनी केयूरला सावरण्यासाठी हात दिला मात्र बबनच्या हातातला केयूरचा हात सुटला आणि दिवा स्थानकाजवळ केऊर लोकल मधून खाली पडला. केयूर लोकल मधून पडल्यानंतर बबन शिलकर यांनी दिवा रेल्वेस्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. त्यांनी केऊर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स मागितली मात्र ॲम्बुलन्स(Ambulance) बाहेर गेली आहे असे सांगण्यात आले. तरीपण केऊरला बेशुद्ध अवस्थेत जवळच असलेल्या रुग्णालयात तीन चाकी टेम्पो मधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
परिणामी डोंबिवली स्थानकातून लोकल गरीत चढणे व उतरणे खूप भीतीदायक झाले आहे. लोकांचे नाहक बळी जात आहेत. लोकांच्या सुखकर प्रवाश्यासाठी डोंबिवली स्थानकातून जास्त लोकल सोडव्यात तसेच कर्जत – ठाणे, कसारा – ठाणे, कल्याण – ठाणे आणि ठाण्यावरून रिटर्न अशा पद्धतीने लोकल गाड्या सोडव्यात अशी मागणी डोंबिवलीकर करीत आहेत.