Yoga : “या” विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0

नागपूर(Nagpur) २१ जून :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवार, दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भारतीय ज्ञान परंपरेत योगासनाला महत्त्वपूर्ण स्थान असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले.

माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आयआयएल संचालक तथा विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. राजेश सिंह, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सदस्य धनश्री लेकुरवाळे, प्रशिक्षक डॉ. तेजसिंह जगदाळे व डॉ. आदित्य सोनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी योगाभ्यासाने आरोग्य उत्तम राहते असे सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या महिला व पुरुष संघांनी सुवर्णपदक प्राप्त केल्याने विद्यापीठाच्या वतीने त्यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाच्या योगासन पथकाचे प्रशिक्षक डॉ. तेजसिंह जगदाळे यांनी उपस्थितांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. जगदाळे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे उपस्थितांनी योगासनाची विविध आसने केली. सुरुवातीला शारीरिक व्यायाम करण्यात आला. त्यानंतर ताडासन, पादहस्थासन, वक्रासन मक्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, शितल प्राणायाम, अनुलोमविलोम, भ्रामरी प्राणायाम, योगाचे आदी विविध आसने केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. देवेंद्र वानखडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता, विविध विभागांचे संचालक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक सादर
आंतरराष्ट्रीय योगपटू तथा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सदस्य धनश्री लेकुरवाळे यांच्या पथकातील विद्यार्थ्यांनी योगासनाचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगासनाच्या प्रात्यक्षिकाने उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले.

सुवर्णपदक विजेत्या संघांचा सत्कार
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून देणाऱ्या महिला व पुरुष संघातील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या हस्ते योगासन महिला संघातील कल्याणी चुटे, छकुली सेलोकार, सुहानी गिरीपुंजे, रचना अंबुलकर, अलिषा गायमुखे, श्रिया दामडे, तर पुरुष संघातील वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, वैभव देशमुख, प्रणय कंगाले, ओम राखडे, वंश खिंची तसेच प्रशिक्षक डॉ. तेजसिंह जगदाळे व ॲथलेटिक संघाचे प्रशिक्षक डॉ. आदित्य सोनी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ आदित्य सोनी यांनी केले.