
बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून सोयाबीन पिकांवर यलो मोझॅक चा प्रादूर्भाव झाल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. उत्पादनावरही परिणाम होणार असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. यलो मोझॅकमुळे सोयाबीन पीक पिवळ्या पडून शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेली सोयाबीन वाळून लागली आहेत. शेंगात दाणे सुद्धा भरत नाही. परिणामी सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पंचनामे करण्याचे आदेश नाही असे अधिकारी सांगतात इतर ठिकाणी आहेत मग बुलढाणा जिल्ह्यात का नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा भेद का केला जातो हा प्रश्न रविकांत तुपकरांनी राज्य सरकारला विचाराला आहे. विमा कंपनीने सांगितले की यलो मोझॅक च्या नावाखाली जर तुम्ही क्लेम केली तर ती रिजेक्ट होईल. कारण त्याला आम्ही यलो मोझॅकचे सुरक्षा कवच घेतलेले नाही. राज्य सरकारची जबाबदारी आहे की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणे त्यांना आधार देणे व तातडीने नुकसान भरपाई देऊन पंचनामे केले पाहिजे अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे. अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल आणि येणार्या काळातील आंदोलन हे आक्रमक असेल हे सरकारने लक्षात ठेवावे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते रविकांत तुपकरांनी राज्य सरकारला दिला आहे.