

नवी दिल्ली (New Delhi), 12 सप्टेंबर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी (Communist Party of India (CPI-M) Chief Minister Sitaram Yechury) यांचे आज, गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह एम्स हॉस्पिटलला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीताराम येचुरी यांना श्वासनलिकेतील इन्फेक्शन झाल्याने 19 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. एम्सने एक निवेदन जारी करत याची माहिती दिली की, येचुरी यांच्या कुटुंबाने मृतदेह अध्यापन आणि संशोधनासाठी एम्स दिल्लीला दान केला आहे.
सीताराम येचुरी यांचा जन्म 1952 मध्ये चेन्नई येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) एमएची डिग्री मिळवली. सीताराम येचुरी 1975 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. कॉलेजमधूनच ते राजकारणात आले.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते 3 वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून येचुरी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत हरकिशन सिंग सुरजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. त्यानंतर सीताराम येचुरी यांना 2015 मध्ये प्रकाश करात यांच्यानंतर सीपीएमचे सरचिटणीस बनवण्यात आले होते.