

रस्त्यांसाठी ४२ कोटीची गरज
गोंदिया (Gondia) :- दररोज लाखो लोकांची वर्दळ असलेल्या जिल्ह्यात ११९ रस्त्यांची हालत खस्ता झाल्याची कबुली खुद्द जिल्हा परिषद देत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवर यमराज टपून बसला आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी ४२ कोटी ५३ लाख रुपये लागणार असल्याने ती मागणी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे केली आहे.
जिल्ह्यातील ११९ रस्त्यांवर प्रत्येकी एक किलोमीटरच्या आत शेकडो खड़े आहेत. हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. एक खड्डा वाचविण्याच्या नादात वाहन दुसऱ्या खड्ड्यात जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलत नाही. या रस्त्यावर बसलेला यमराज कधी कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.
जिल्ह्यातील ११९ रस्ते जीर्ण झाले असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत, अशी कबुली जिल्हा परिषद देत असताना जिल्ह्यात दौऱ्यावर जाणाऱ्या पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह सर्वच लहान- मोठ्या अधिकाऱ्यांना हे रस्ते दिसत नाही काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. रस्त्यांची हालत खस्ता झाली असून, या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे येत नाही. येथील रस्त्यांवर मोठे खड़े असून, त्यावरून वाहन चालविताना वाहनाचे संतुलन बिघडते.